वाघोली (पुणे): शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार अशोक पवार, तर महायुतीकडून अजित पवार यांनी ऐनवेळी ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांना पक्षात घेत निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. अशोक पवार यांच्याप्रमाणे गावांगावात माऊली कटके यांनी प्रचाराचा धडाका लावला होता. त्यामुळे या मतदारसंघात देखील प्रचंड चुरस पाहायला मिळत आहे. आज (दि. २०) सकाळपासून त्यासाठी मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे.
त्यातच विरोधकांकडून वाघोली येथे राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या पोलिंग एजंटला दमदाटी केल्याचा आरोप केला जात आहे. त्यानंतर दमदाटी करणाऱ्या लोकांवर पोलिसांनी कारवाई केली नाही, तर उपोषणाला बसण्याचा इशारा आमदार अशोक पवार यांनी दिला आहे. काही गुंड प्रवृत्तीचे लोक आमच्या पोलिंग एजंटला आम्ही इथले गाववाले आहोत, म्हणून धमकी देत आहेत. त्यांना घाबरून काही पोलिंग एजंट निघून गेले. तसेच काही लोक मतदान केंद्रापासून १०० मीटर अंतराच्या आतमध्ये थांबून ते तिथे तासंतास घुटमळत आहेत. अशा लोकांना पोलीस अधिकाऱ्यांनी ताबडतोब बाहेर काढावे, असं देखील आमदार अशोक पवार यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना पवार म्हणाले की, विरोधक लोकशाही मानतात की नाही. मतदान केंद्रावर येऊन एक-एक व्यक्तीला दम देऊन तुम्हाला दहशत निर्माण करायची आहे? असा सवालही आमदार पवार यांनी उपस्थित केला आहे. आता या प्रकारानंतर पोलीस काय कारवाई करतात? हे पाहणे महत्वाचे आहे.