पुणे : पुण्यात एका तरुणाला कामावरुन काढण्याच्या भीतीने आणि व्यवस्थापकाच्या त्रासाला कंटाळून बोपोडीतील नदीपात्रात उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशाल प्रमोद साळवी (वय-36 रा. पंचशीलनगर, येरवडा) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
ही घटना २१ जून रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. याबाबत विशाल यांची बहीण प्रीती अमित कांबळे (वय-42 रा. पिंपळे गुरव) यांनी खडकी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. या प्रकरणी आयटी कंपनीचे व्यवस्थापक झिशान हैदर याच्या विरोधात खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल साळवी हा तरुण येरवड्यात राहण्यास आहे. येरवड्यातील कॉमर झोन परिसरातील आयटी कंपनीत कामाला होता. व्यवस्थापक झिशान याने विशालचा इतर कामगारांसमोर अपमान करून, त्याला कामावरुन काढून टाकण्याची धमकी दिली होती. त्यावेळी विशाल याला कामावरुन काढून टाकण्यात आले.
दरम्यान,विशाल याने आत्महत्या करण्याआधी, व्हॉट्सअॅपर व्यवस्थापक झिशान याचा फोटो स्टेटसला ठेवला होता. तसेच कंपनीच्या व्यवस्थापकामुळे आत्महत्या करत आहे. असे चिठ्ठीत लिहून ठेवले होते. चिठ्ठी लिहून विशाल याने नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केल्याचे, फिर्यादीत नमूद केलेले आहे.
याबाबत, कामावरुन काढून टाकल्याने आणि कंपनीतील व्यवस्थापकाच्या त्रासाला कंटाळून विशाल याने 21 जून रोजी रात्रीच्या वेळी बोपोडीतील नदीपात्रात उडी मारुन आत्महत्या केली आहे. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्यामुळे कंपनीच्या व्यवस्थापकाविरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक चोरमले करीत आहेत.