सागर जगदाळे
भिगवण, (पुणे) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने शिक्षक, शाळा व विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी सोमवारी (ता. ११) नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विधीमंडळावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी पुणे जिल्ह्यातून शिक्षक समितीचे बहुतांश शिक्षक उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सुनिल वाघ व जिल्हा सरचिटणीस संदीप जगताप यांनी दिली.
मोर्चातील प्रमुख मागण्या
– ‘शिक्षकांना शिकवू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या.
– जुनी पेन्शन योजना लागू करा.
– सततची ऑनलाइन कामे व अशैक्षणिक कामे बंद करा.
– गावात शासकीय निवासस्थान उपलब्ध होईपर्यंत मुख्यालयी राहण्याची सक्ती करु नका.
– शाळा दत्तक योजना अमलात आणू नका.
– कमी पटसंख्येच्या शाळा बंद करु नका.
– समूह शाळा योजना राबवू नये.
– सातवा वेतन आयोग थकीत रक्कम त्वरीत द्यावी.
अशा विविध मागण्या या आक्रोश मोर्चात करण्यात येणार असल्याचे सुनिल वाघ व संदीप जगताप यांनी सांगितले. या वेळी राज्य कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर, राज्य सल्लागार महादेव माळवदकर पाटील, जिल्हा नेते शरद निंबाळकर, जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब लांघी, कोषाध्यक्ष सुनिल लोणकर, महिला आघाडी अध्यक्षा प्रियतमा दसगुडे, सरचिटणीस मधुबाला कोल्हे, व सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.