राहुलकुमार अवचट
यवत : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दौंड तालुक्यातील हजारो मराठा आंदोलक आज (ता. २३) मुंबईकडे रवाना झाले. सोबतच वाहनांमध्ये राहण्याची आणि अन्नधान्य, पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघालेल्या मराठा मोर्चाचे यवत येथील मुख्य चौकात आगमन होताच यवत येथील समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने शाल व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
मराठा आरक्षणासाठी मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनासाठी जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथून निघाले आहेत. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाच्यावतीने यवत येथे तालुक्यातील हजारो मराठा बांधव एकत्र आले होते. यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘एक मराठा, कोटी मराठा’, ‘जरांगे पाटील आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देत मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले.
आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघालेल्या मराठा मोर्चाचे यवत येथील मुख्य चौकात आगमन होताच यवत येथील समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने शाल व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. मराठा समाजाला नुसता पाठिंबा जाहीर न करता अनेक मुस्लिम बांधव या मोर्चात सामील झाले. मुंबईकडे निघालेले मराठा बांधव यवत ते उरुळी कांचन दरम्यान पदयात्रा काढणार असून, रस्त्यात कासुर्डी, खामगाव फाटा, जावजीबुवाची वाडी, सहजपूर, बोरीभडक आदी ठिकाणी त्यांची चहा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उरुळीकांचन येथील कस्तुरी मंगल कार्यालय येथे भोजनाची व्यवस्था केली आहे. रात्री मनोज जरांगे पाटील यांचा मुक्काम असलेल्या वाघोली येथे जाणार असून, पुढील तीन दिवस मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चात हजारोच्या संख्येने निघालेला मराठा समाज हा पुढे लाखोच्या संख्येने मुंबईमध्ये पोहोचेल, असे सहभागी झालेल्या बांधवांनी सांगितले.
या वेळी यवत, पारगाव, केडगाव, पाटस, वरवंड या गावांसह दौंड तालुक्यातील व शहरातील अनेक मराठा बांधव या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत.