राहुलकुमार अवचट / यवत : तुळशी विवाहानंतर लग्नसराई हंगाम सुरु होत असून अनेक विवाह इच्छुक वधू-वरांसाठी व यंदा कर्तव्य आहे, अशांसाठी तुळशी विवाहानंतर लग्नाचे बार उडणार असून जुन २०२५ पर्यंत जवळपास ७० मुहूर्त आहेत. १३ नोव्हेंबर पासून तळशी विवाहास प्रारंभ होत आहे. लग्न सराईतला १७ नोव्हेंबरला हंगामातील पहिला विवाह मुहूर्त रविवार असल्याने मोठी तिथि आहे.
यावर्षी गुढीपाडव्या पर्यंत एकूण ४४ शुभमुहूर्त असल्याने विवाह इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहेत. दिवाळी सणाची सांगता ही खरी तुळशीच्या लग्नाने होत असते. १३ नोव्हेंबर रोजी तुळशी विवाहाने लग्नसराईला प्रारंभ होणार आहे. सध्या पुणे जिल्ह्यात सर्वच समारंभांना उत्सवाचे स्वरुप आल्याने लग्न सराईतही धूमधडाक्यात लग्नाचे बार उडणार आहेत.
यंदाच्या लग्न सराईमध्ये गुढीपाडव्यापर्यंत एकूण ४४ तर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ७० शुभमुहूर्त असल्याने यंदा कर्तव्य असलेल्या अनेक विवाह इच्छुकांना दोनाचे चार हात करण्याची संधी मिळणार आहे. लग्नसराईचा हंगाम नोव्हेंबर ते जून अखेरपर्यंत असून या हंगामातील पहिला शुभमुहूर्त १७ नोव्हेंबर तर ८ जून हा अखेरचा शुभमुहूर्त आहे.
त्यामुळे चांगला शुभमुहूर्त गाठून लग्नाचा बार उडवून टाकायचाच अशी खूनगाठ मनाशी बाधून अनेक विवाह इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहेत. वधू-वर माता-पित्यांची सोयरीक जुळवण्यासाठी लगबग सुरु झाली आहे. दिवाळीतील नातलगांच्या भेटीगाठीमध्ये स्थळ दाखवण्याचा कार्यक्रमही होत असून दिवाळीच्या सुट्टीत एकत्र आल्याने विचारांची देवाण – घेवणी बरोबरच स्थळांचीही देवाण घेवाण होत आहे. ज्यांचे विवाह आधीच जमलेली आहेत, अशाने कार्यालय मालकांकडून मंगल कार्यालयांच्या बुकींगला वेग आला आहे.
दाते, रुईकर, देशपांडे आदि पंचागच्या अभ्यासानुसार शुभमुहूर्तासह काढीव तिथी सुचवल्या जात आहेत. लग्नसराई सुरु होत असल्याने यावर अवलंबून असलेल्या अनेक व्यावसायिकांचाही हंगाम सुरु होणार आहे. लग्न सोहळ्यांमध्ये हौसेसाठी वारेमाप खर्च केला जात असल्याने या व्यावसायिकांचा हंगामही बहरणार आहे.
या लग्नसराईत सर्वाधिक म्हणजेच प्रत्येकी १४ शुभ मुहुर्त डिसेंबर व मे महिन्यात असून, जून महिन्यात सर्वात कमी ५ मुहूर्त आहेत, तर नोव्हेंबर व जानेवारी महिन्यात ६, फेब्रुवारी मध्ये ११, मार्च मध्ये ८, एप्रिलमध्ये ७ मुहूर्त आहेत.
नोव्हेंबरमध्ये १७, डिसेंबरमध्ये १५,२२, जानेवारीमध्ये १९, २६, फेब्रुवारी १६, २३ , मार्च २, एप्रिलमध्ये २०,जून मध्ये ८ या तारखेला रविवार येत असल्याने अनेकांनी या तारखांना विवाह कार्यालय बुकिंग साठी कार्यालय मालकांकडे आग्रह धरलेला आहे. २३ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीची मतमोजणी असल्याने अनेक वधू – वरचा हिरमोड झाला असून राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते लग्नाला उपस्थित राहू शकत नसल्याने लग्नाची तारीख देखील बदललेली आहे.