पुणे : विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत. आज (२६ ऑक्टोबर) सकाळीच काँग्रेसची दुसरी यादी जाहीर केली होती. त्यानंतर आजच संध्याकाळी तिसरी यादी देखील काँग्रेसने जाहीर केली आहे.
या तिसऱ्या यादीमध्ये १६ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. आत्तापर्यंत काँग्रेसने ८७ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. या तिसऱ्या यादीत मुंबईतील मतदारसंघाचाही समावेश आहे. काँग्रेसने शनिवारी रात्री जाहीर केलेल्या यादीत सांगलीतून पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माणिकराव ठाकरे यांनाही दिग्रसमधून संधी मिळाली आहे. तर काँग्रेस नेते सचिन सावंत यांना अंधेरी पश्चिममधून उमेदवारी जाहीर केली आहे.