( सतीष फिरोदिया, मुख्याध्यापक, जय मल्हार हायस्कूल जांबूत ता. शिरूर )
शिरूर – प्रपंचाचा गाडा ओढत नोकरी व्यवसायात यशस्वीपणे जबादाऱ्या संभाळायच्या, शेतामध्ये काबाडकष्ट करत मुलांचा भार सोसायचा त्यातून प्रगतीचे प्रगतीचे सर्वोच्च टोक गाठत समाजात नावलौकीक मिळवायचा, असेच धोरण महिलांचे असल्याचे पहावयास मिळते. खरे तर अशा सर्वच महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दीक शुभेच्छा.
नेमबाजीमध्ये भारतीय महिलांनी देदिप्यमान कामगिरी करत सुवर्णपदके पटकाविली. महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करीत असल्याचे एक समाधानी चित्र डोळ्यासमोर दिसत आहे.
स्त्री-पुरुष समानतेचे तत्त्व समाजात व्यवस्थितपणे रुळलेय, असे वाटत असताना; आजची स्त्री पुरूष ही सामाजीक दरी झालेली पहावयास मिळते. स्त्री जन्माबरोबर पुरूष जन्मदर वाढला असल्याने सामाजिक जाणिव किती भयानक आहे. याची प्रचिती येते. त्यामुळे समाजात स्त्रीचे महत्व निर्माण करण्यासाठी अजून बरीच लढाई बाकी आहे. ही लढाई समाजातील लैंगिक विषमतेची आहे. मुलगी नको या मानसिकतेच्या विरोधातील आहे.
ज्यावेळी एका बाजूला बेटी बचावो बेटी पढावो असे म्हणतो, तेंव्हा आम्हाला या उपक्रमाच्या माध्यमातून समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहचलेला संदेश समजतो. मात्र आजही समाजातील लैंगिक विषमता मोडून काढणं अवघड आहे, हे लक्षात येते. हे जरी असले तरी अशक्य मुळीच नाही हे वारंवार जाणवते. त्यादृष्टीने आपण सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे.
अलीकडच्या दोन-तीन वर्षांत मात्र परिस्थिती बदलली आहे. स्त्री-पुरुष समानतेच्या तत्त्वाला अनेक ठिकाणी जाणीवपूर्वक दुर्लक्षित करण्यात येतेय की काय अशी शंका यावी अशी ही परिस्थिती आहे. कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे गर्भलिंग तपासणीला आळा बसला होता, त्या चाचण्यांचे प्रमाण पुन्हा वाढत असून कोवळ्या कळ्या गर्भातच खुडण्याच्या प्रवृत्तीने पुन्हा एकदा समाजात डोके वर काढले असल्याची भिती व्यक्त केली जाते.
कायद्याची कठोर अंमलबजावणीची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली असली तरी समाजाची मानसिकताही आमूलाग्र बदलण्यासाठी अजून बराच टप्पा गाठावा लागणार आहे. या दीर्घकालिन लढाईसाठी सज्ज होण्याचा संकल्प करण्यासाठी जागतिक महिला दिन हा उत्तम दिवस आहे.
लिंग गुणोत्तराचे प्रमाण ढासळले असतानाच आणखी एका महत्त्वाच्या बाबीकडे लक्ष द्यावे लागेल ते म्हणजे, मुलींचं शिक्षणातील स्थान. यापुर्वीच्या शासनकर्त्यांनी शाळेतील मुलींचा टक्का वाढावा यासाठी सुक्ष्म पातळ्यांवर नियोजन केलं होतं. वाड्यावस्त्यांवर शाळा काढून तेथील मुलींना शाळेत पाठविले. त्यातूनच अनेक मुली शिकल्या.
त्यांनी विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला. या शाळा सुरू राहण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले पाहिजे. या शाळा दुर्गम ठिकाणीही आहेत. मुलींना शिकावे अशी खेड्यापाड्यातील पालकांची मानसिकता अजूनही शंभर टक्के जिथे झालेली नाही तिथे जर जवळ शाळाच नसेल तर ते आपल्या मुलींना शाळेत पाठवतील का, असा प्रश्न उपस्थित होतो.
या पाठोपाठ मुलींच्या आरोग्या बाबत काळजी घेणे महत्वाचे आहे. महिला वर्गात आरोग्याविषयी जनजागृती होत नाही. थोडक्यात रक्तातील लोहाचे प्रमाण कमी होणे. यामुळे अनेक आजाराला महिला बळी पडताना दिसतात. त्या पाठोपाठ मुलींमध्ये खरा स्पर्श आणि वाईट स्पर्श या बाबत देखील जागरूकता होणे आवश्यक आहे.
शालेय जीवनात ऐन तारूण्याच्या उंबरठ्यावर या मुलींच्या जीवनाला थोड्याशा मोहाने कलाटणी बसते. यासाठी खरे तर शासनपातळीवर मार्गदर्शन केंद्र उभारणी होणे अती-आवश्यक बाब आहे.
शब्दांकन : युनूस तांबोळी