लोणी काळभोर : रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन भुरट्या चोरट्यांनी इमारतीतून साहित्याची चोरी केल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील पालखी स्थळाजवळ आज गुरुवारी (ता.20) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेत चोरट्यांनी सुमारे 25 हजाराचे साहित्य लंपास केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय लक्ष्मण काळभोर (वय -53, अष्टापुरे मळा, कदमवाकवस्ती ता. हवेली) हे जनता विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष आहेत. सोसायटीचे दुरुस्ती व देखभालीचे काम सुरू होते.
दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास तब्बल 11 फूट उंचीवरून उडी मारून सोसायटीत प्रवेश केला. आणि इमारतीतील पाच हजार रुपये किमतीच्या दोन मोटार, ब्रेकर मशीन व लोखंडी साहित्य असा सुमारे 25 हजार रुपयांचा मुद्देमान लंपास केला.
या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू आहे.