पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. असं असताना कडक उन्हात दुचाकीवरुन जाणाऱ्या एका कामगाराला अचानक चक्कर आली. त्यामुळे त्याची शुद्ध हरपल्याने तो रस्त्याच्या कडेला झाडीत पडला. त्याला मदत करण्याऐवजी अज्ञात व्यक्तीने त्याच्याकडे असलेली २३ लाख ५० हजार रुपयांची बॅग पळवून नेली.
ही घटना कात्रज घाटातील हॉलीडे हॉटेलजवळ २९ एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी ३५ वर्षीय उद्योजकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पोलीस कात्रज घाट परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या कामासाठी २३ लाख ५० हजार रुपये घेऊन फिर्यादी यांचा कामगार कात्रज घाटातून निघाला होता. त्यावेळी कात्रज घाटातील हॉलीडे हॉटेलजवळ आला असता कामगाराला अचानक चक्कर आली. त्यामुळे त्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला लावली. उन्हामुळे काहीवेळ त्याची शुद्ध हरपल्याने तो रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडीत झोपला होता.
दरम्यान, कामगाराने पैशांची बॅक त्याच्या गाडीच्या हँडलला अडकवली होती. त्यावेळी चोरट्यांनी हँडलला अडकवलेली पैशांची बॅग पळवून नेली. हा प्रकार लक्षात येताच कामगाराने या घटनेची माहिती कंपनीच्या मालकाला दिली. त्यानंतर कंपनी मालकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गुप्ता करत आहेत.