कोथरूड (पुणे): कोथरूडच्या शास्त्री नगरमध्ये उष्णता वाढल्याने एका कुटुंब घराच्या टेरेसवर झोपलेले असतांना रिकामे घर पाहून चोरांनी डल्ला मारल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. २० एप्रिल रोजी रात्री ९:३० वाजता मराठा महासंघ सोसायटीत राहणारे हे कुटुंब घराला कुलूप लावून टेरेसवर झोपण्यासाठी गेले होते. सकाळी ६:३० वाजता पत्नी मुलांना शाळेसाठी तयार करण्यासाठी घरी परतली तेव्हा तिला दार उघडे दिसून आले, घरातील सामन विखुरलेले होते. सामानाची तोडफोड झाली होती.
घटनेत चोरट्यांनी कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि चांदीच्या वस्तूंसह २.०४ लाख रुपयांच्या मौल्यवान वस्तू चोरून नेल्या होत्या. यात घरातील २२ ग्रॅम सोन्याची चैन, ५ ग्रॅमची अंगठी, साडेतीन ग्रॅमचे मंगळसुत्र, साडेतीन ग्रॅमचे झुमके, दोन ब्रेसलेट, चांदीचा कडा, चांदीच्या तीन अंगठ्या असा २ लाख ४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. याबाबत अमोल विश्वनाथ काष्टे ( २५) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिस उपनिरीक्षक बालाजी सानप तपास करत आहेत. पोलिस गुन्हेगारांना ओळखण्यासाठी आणि त्यांना पकडण्यासाठी काम करत आहेत. चोरीची ही घटना परिसरातील चोरीच्या वाढत्या गुन्ह्यांकडे इशारा करते. रहिवाशांना त्यांची घरे आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.