लोणी काळभोर : घरी कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी इमारतीतील सदनिका फोडून त्यामधील रोख रकमेसह सुमारे पावणे 4 लाखांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना वडकी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत शुक्रवारी (ता.2) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी नवनाथ जगन्नाथ आंबेकर (वय-38, रा. मोरेश्वर रेसिडेन्सी, बी विंग, पहिला मजला प्लॅट नं 201, वडकीगाव ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नवनाथ आंबेकर हे एक शेतकरी असून कुटुंबासोबत वडकी परिसरात राहतात. तसेच फिर्यादी यांचा भाऊ काळूराम जगन्नाथ आंबेकर हे सुद्धा एकमेकांच्या शेजारी राहत आहेत. दरम्यान, आंबेकर बंधू हे वैयक्तिक कामानिमित्त शुक्रवारी (ता.2) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कुटुंबासोबत बाहेर गेले होते. काम आटोपून घरी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आले असता, घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले.
नवनाथ आंबेकर यांनी राहत्या घराजवळ जाऊन पाहणी केली असता, घराच्या दरवाजाला लावलेला कडी कोयंडा तुटलेला आढळून आला. घरात जाऊन पाहणी केली असता, घरातील लाकडी कपाटामध्ये ठेवलेले अर्धा तोळा वजनाचे सोन्याचे व 10 भाराचे चांदीचे दागिने, 56 हजार रोख रक्कम असे सुमारे 95 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला नाही.
त्यानंतर भाऊ काळूराम आंबेकर यांच्याही घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. त्यांच्या घरातीलही चोरट्यांनी लाकडी कपाटामध्ये ठेवलेले 3 तोळे 7 ग्रॅम वजनाचे सोन्याचे व 3 भाराचे चांदीचे दागिने, 32 हजार रोख रक्कम असे सुमारे 2 लाख, 47 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला नाही. असा दोन्ही घरातील एकूण 3 लाख 78 हजार व 400 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला.
दरम्यान, याप्रकरणी नवनाथ आंबेकर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके करीत आहेत.