पुणे : चोरीचा माल लपविण्यासाठी चोरटे अनेक शक्कल लढवतात. मात्र, पोलीस मोठ्या शिताफीने चोरट्यांपर्यंत पोहोचतात. अशीच एक घटना फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. सराफी दुकानातील सोने चोरून चोरट्यांनी शेतात पुरले. पोलिसांनी ते मेटल डिटेक्टरने शोधून आरोपींना अटक केली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त संदीप गिल्ल यांनी दिली.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, १ जानेवारी रोजी सर्वत्र नववर्षाचे स्वागत उत्साहात होत असताना, पुण्यातील रविवार पेठेतील राज कास्टिंग या सोन्याच्या दुकानात पहाटे ५ किलो ३२३ ग्रॅम सोने आणि १० लाख रोख रकमेची चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली.
दरम्यान, याच दुकानात काम करणारा एक कामगार आजी वारल्याचे कारण सांगत गावी निघून गेला होता. यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी या कामगाराची उलटतपासणी केली असता, मुख्य आरोपी सुनील कोकरे याने आपल्या इतर ३ साथीदारांसोबत चोरी केल्याचे समोर आले. पोलिसांनी कोकरेसह त्याच्या साथीदारांना २४ तासांत बेड्या ठोकल्या होत्या. यापैकी ३ आरोपी हे सांगली येथील जत तालुक्यात तर एक आरोपी कोल्हापूर येथे लपून बसला होता.
या आरोपींनी संपूर्ण माल विभागून शेतात लपवल्याने पुणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. परंतु, सांगली पोलिसांच्या मदतीने मेटल डिटेक्टरने जवळजवळ साडेतीन किलोचा माल आणि ९ लाख ७१ हजार रुपये शोधून काढण्यात पुणे पोलिसांना यश आले. या चौघांना पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.