लोणी काळभोर, (पुणे) : घरी कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी बंगला फोडून घरातील सुमारे 80 तोळ्यांच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कमेवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना शनिवार (ता. 3) पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील स्टार सिटी येथील लेन नंबर तीन मधील मातोश्री बंगल्यावर घडली आहे. रवींद्र जाधव असे घरफोडी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र जाधव हे आरोग्य विभागातून सेवानिवृत्त झाले असून ते कुटुंबासोबत स्टार सिटी येथील मातोश्री बंगल्यावर राहत आहेत. दरम्यान, रवींद्र जाधव हे मागील दोन दिवसापूर्वी त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. शनिवारी (ता. 2) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास तीन चोरटे दुचाकीवरून आले. त्यांनी जाधव यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची दिशा बदलली.
त्यानंतर चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. आणि घरातील सुमारे तीन लाखाहून अधिक रोख रकमेसह अंदाजे 80 तोळे सोने लंपास केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान चोरटे हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट, पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके, पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू आहे.