लोणी काळभोर, ता. 18 : शासनाचा स्क्रॅपचा माल विकत घेऊन ठेवलेले गोडाऊन चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली आहे. ही घटना उरुळी देवाची (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत शुक्रवारी (ता.7 फेब्रुवारी) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली असून चोरट्यांनी या चोरीत 40 लाख रुपयांचे इलेक्ट्रीकल स्क्रॅप साहित्य लंपास केले आहे. तर चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
याप्रकरणी नितीन कोठारी (वय-51, मार्केटयार्ड पुणे) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भारतीय न्याय दंड संहिता कलम 334(1),305 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नितीन कोठारी हे एक व्यावसायिक असून त्यांचे उरुळी देवाची (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील सर्व्हे नंबर 286/1/6 येथे प्रणाम इंटरप्रायझेस या नावाने स्क्रॅप साहित्य ठेवण्याचे गोडावून आहे. या गोडावूनमध्ये शासनाचे इलेक्ट्रीकल स्क्रॅप, संगणक, मोबाईल व वायर इत्यादी लाखो रुपयांचे भंगाराचे साहित्य ठेवण्यात आले होते.
दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी 7 फेब्रुवारीला गोडावूनच्या भिंतीचा पत्रा उचकटला. आणि गोडावून मध्ये प्रवेश करून त्यातील संगणक व मोबाईल मधील चांदीचे पार्ट, वायर मधील अल्युमिनियम धातू व तांब्याची तारा असा सुमारे 40 लाख रुपयांचे भंगार चोरून नेले आहे. पुढील तपास फुरसुंगी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विष्णु देशमुख करीत आहेत.






