पुणे : ऐन दिवाळीच्या दिवसात वेगवेगळ्या घटनेत चोरट्यांनी सदनिकेतून नऊ लाखांचे दागिने चोरून नेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. वारजेसह लोणी काळभोर परिसरात ह्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. याबाबत एका महिलेने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तक्रारदार महिला वारजे भागातील तावरे बिल्डींगमध्ये राहायला असून शनिवारी सायंकाळी त्यांच्या सदनिकेचा दरवाजा उघडा होता. लक्ष्मीपूजनानिमित्त त्यांनी देवघरात सोन्याचे दागिने ठेवले होते. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर त्या कपाटात दागिने ठेवण्यास विसरल्या होत्या. देवघरात पूजनासाठी ठेवलेले दागिने आणि रोकड असा सात लाख २० हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. महिलेच्या घरात चोरी करणारा चोरटा माहितगार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक मोहिते तपास करत आहेत.
तसेच लोणी काळभोर भागातील एका महिलेच्या घरातून एक लाख ७६ हजार रुपयांचे दागिने चोरल्याची घटना घडली आहे. तक्रारदार महिलेने लक्ष्मीपूजनानिमित्त दागिने कपाटातून काढून ठेवले होते. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर महिलेने आपले दागिने टेबलवर ठेवले होते. कपाटात दागिने ठेवण्याच्या त्या विसरून गेल्या होत्या. चोरट्यांनी टेबलवरील पावणेदोन लाखांचे दागिने चोरून ते पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार तपास करत आहेत.