पुणे: पुण्यातील प्रसिद्ध सराफा व्यावसायिकाच्या घराच्या शिफ्टिंग दरम्यान तब्बल १.६० कोटी रुपयांचे सोन्याचे बिस्किट चोरल्याबद्दल ३३ वर्षीय कामगार नेताजी जाधव याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यावसायिकाच्या घराचे शिफ्टिंग करण्यासाठी जाधव यांना बोलावले होते. या प्रक्रियेदरम्यान, त्यांनी तिजोरीतून २० सोन्याची बिस्किटे चोरली आणि ती घेऊन पळ काढला. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्वेलर्स गौतम सोलंकी यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला, पुरावे गोळा केले आणि जाधव यांना अटक केली.
ज्वेलर्स गौतम सोलंकी यांचे पुण्यातील मध्य भागात ज्वेलरी शाॅप आहे. गौतम सोलंकी आणि त्यांचे भाऊ दुकानाचा कारभार सांभाळतात. गौतम सोलंकी यांनी टिळक रस्त्यावर नवीन घर घेतले आहे. शुक्रवार पेठेतून नवीन ठिकाणी घराचे शिफ्टिंग सुरू असतांना हि धक्कादायक घटना घडली आहे. साहित्यात चोरट्याला वडिलोपार्जित तिजोरीत सोन्याचे बिस्कीट दिसले, तिजोरीत गौतम यांच्या लहान भावाने सोन्याचे बिस्कीट ठेवले होते. याबाबत गौतम सोलंकी यांना कल्पना नव्हती. तिजोरी लिफ्टमध्ये जात नसल्याने त्याचा दरवाजा काढला असता त्यात बिस्कीट असल्याचे चोरट्याला दिसले. सोन्याचे बिस्कीट पाहून चोराचे डोळे चमकले. त्याने सोन्याच्या बिस्कीटावर डल्ला मारून पळ काढला.
दरम्यान, पोलिसांनी चौकशी करून चोराला अटक केली असून जाधवच्या ताब्यातून चोरीला गेलेले सोन्याचे बिस्किट जप्त करण्यात आले आणि त्याला न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली. जाधवचे काही साथीदार होते का हे शोधण्यासाठी पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.