पिंपरी : महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास करणाऱ्या सराईत चोरट्याला गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने अटक केली. विशेष म्हणजे सीसीटीव्हीवरून तांत्रिक तपास करत चोरट्याच्या इन्स्टाग्राम आयडीवरून त्याचा नंबर मिळवत पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मोनुकुमार लल्लन बिंद (वय २६, रा. पवार वस्ती, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पल्लवी कृष्णा खंडागळे (वय २७, रा. भक्ती हौसिंग सोोसयटी, घरकुल, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी (दि. १६) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास चिखली नेवाळे वस्ती येथे घडली. फिर्यादी पल्लवी या मंगळवारी पायी घरी येत होत्या. त्या घरकुल येथे आल्या असता त्यांच्या समोरच्या दिशेने आलेल्या चोरट्याने पल्लवी यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किंमतीचे १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनी मंगळसूत्र हिसकावले.
दरम्यान, सोनसाखळी चोरल्यानंतर काही अंतर गेल्यावर आरोपी दुचाकीवरून पडला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता त्यामध्ये आरोपीचा चेहरा स्पष्ट दिसला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या इन्टाग्राम आयडीवरून फोन नंबर मिळविला. त्या फोन नंबरच्या आधारे त्याला दरोडा विरोधी पथकाने अटक केली. आरोपी मोनुकुमार याने रविवारी देखील चिखली परिसरात सोनसाखळी चोरल्याचे समोर आले असून पुढील तपास सुरु आहे.