संदीप बोडके
थेऊर (पुणे): सातबारा उताऱ्यावरील फेरफार नोंद मंजूर करण्याच्या नावाखाली शेतकऱ्याकडून सात हजार रुपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी थेऊरच्या मंडलाधिकारी जयश्री कवडे व त्यांच्या दोन खासगी इसमांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. एसीबीने केलेल्या कारवाईमुळे नागरिकांनी थेऊरमध्ये फटाके फोडून मोठा जल्लोष केला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जयश्री कवडे यांच्यासाठी सात हजाराची लाच स्विकारणाऱ्या योगेश तातळे व विजय नाईकनवरे या दोघांना रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जयश्री कवडे यांच्या दोन बगलबच्च्यांना अटक केली असली, तरी गुन्हा दाखल होत असताना खुद्द जयश्री कवडे मात्र फरार होण्यास यशस्वी ठरल्या आहेत.
दरम्यान मंडलाधिकारी जयश्री कवडे यांनी लोणी काळभोरच्या तलाठी पद्मिनी मोरे यांच्यासह आणखी काही तलाठ्यांना हाताशी धरुन, मागील सात आठ महिन्यांच्या काळात महसूल नियमांना धाब्यावर बसवून अनेक चुकीची व बेकायदेशीर कामे करुन पैसे वसुलीचा धुडगुस चालवला होता. याबाबत पुणे प्राईम न्यूज”ने वारंवार आवाज उठवत जयश्री कवडे, पद्मिनी मोरे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांच्या काळ्या कृत्यांच्या कामकाजाचा “पंचनामा” प्रकाशित करून त्याबाबतचे पुरावेही प्रशासनाला दिले होते. मात्र, प्रोटोकॉलच्या अर्थपूर्ण संबंधामुळे वरिष्ठांकडून कोणतीही कारवाई केली जात नव्हती. परंतु, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जयश्री कवडे व त्यांच्या दोन बगलबच्च्यांवर लाच स्विकारताना कारवाई केल्याने, “पुणे प्राईम न्यूज”च्या भूमिकेवर मोहर उमटली आहे. तसेच हवेली महसूलची विभागाची उरली सुरलेली अब्रूही मातील मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हवेली तहसीलदार कार्यालयाने वरील प्रकरणातील तक्रारदार यांच्या सातबारावर झालेल्या चुकीच्या दुरुस्ती कामी पारित केलेल्या १५५ च्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी कोलवडी तलाठी व थेऊर मंडलाधिकारी यांना आदेशित केलेले होते. वरीष्ठांच्या आदेशानुसार कोलवडी गावच्या तलाठ्यांनी याबाबतची फेरफार नोंद घेतलेली होती. संबंधित फेरफार आदेशाची नोंद एकाच दिवसात मंजूर करता येते. मात्र, आर्थिक प्रोटोकॉलसाठी मंडल अधिकारी जयश्री कवडे यांनी ती फेरफार नोंद मंजूर करण्यास “विलंबाचा कोलदांडा” लावत तक्रारकदाराची फेरफार नोंद प्रलंबित ठेवली होती. ती फेरफार नोंद मंजूर करणेकामी त्यांच्या खाजगी इसमांमार्फत तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची लाच मागितली होती.
तहसीलदार कार्यालयाचे आदेश असतानाही काम होत नसल्याने चिडलेल्या तक्रारदाराने याबाबतची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली होती. सदर तक्रारीची पडताळणी एसीबी विभागाने पंचासमक्ष केली होती. अखेर मंगळवारी (ता. 13) रात्री उशीरा तक्रारदाराकडून तडजोड अंती सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना तातळे व नाईकनवरे या दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईची कुणकुण लागल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी जयश्री कवडे यांच्यापर्यंत पोहचण्यापुर्वीच त्या मोबाईल स्विच ऑफ करुन फरार झाल्या आहेत.
“पुणे प्राईम न्यूज”ने पंचनामा केलेली जयश्री कवडे व त्यांच्या सहकाऱ्यांची काळी कृत्ये..
१) जयश्री कवडे यांनी चक्क प्रांतचे अधिकार वापरुन कार्यक्षेत्रातील रद्द केलेल्या नोंदी पुन्हा टाकत प्रोटोकॉलच्या जोरावर मंजूर केल्या आहेत. त्यामुळे हवेलीतील प्रांतचे अधिकार तलाठी व सर्कलला कोणी बहाल केले? तसेच रद्द झालेल्या नोंदी पुन्हा टाकून मंजूर करणे, या गंभीर प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अद्याप चौकशीही झालेली नाही.
२) लोणी काळभोरच्या तलाठी पद्मिनी मोरे व मंडलाधिकारी जयश्री कवडे यांनी संगनमताने सव्वा दोन लाखाचा महसूल बुडवल्याचा प्रकार पुणे प्राईम न्यूजने उघडकीस आणला आहे. लोणी काळभोर येथील गट नंबर 810 तुकडेबंदी कायद्यातील तरतुदी फेरफार नोंदीला लागू असतानाही शासनाचा महसूल बुडवून फेरफार नोंद 14695 मंजूर करण्याचा महसूली पराक्रम केला आहे. याबाबतची तक्रार तत्कालीन पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे यांच्याकडे केली होती.
३) जयश्री कवडे यांनी एकाच महिन्यात लोणी काळभोर, कदमवाकवस्ती आणि कोलवडीमधील एकूण ३६ फेरफार रद्द केले आहेत. ई-फेरफारचा योग्य अमंल होत नसल्याचे कारण देत प्रोटोकॉलसाठी नोंदी रद्द केलेल्या आहेत. यामधील आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे लोणी काळभोरमधील बिनशेती (एनए) गटातील एक फेरफार नोंदही रद्द करण्यात आली आहे. नागरिकांची कामे वेळेवर होत नसल्याने त्याबाबतच्या तक्रारी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रलंबित आहेत.
४) कोलवडी व लोणीकाळभोर येथील एक महिन्याच्या कालावधीतील ३६ फेरफार नोंदी, तसेच थेऊर आणि कुंजीरवाडीमधील ३९ फेरफार व मांजरी बुद्रुकमधील १७ फेरफार नोंदी अशा एकूण ९२ फेरफार नोंदी रद्द केलेल्या आहेत. मात्र, त्यातील केवळ तीन फेरफार नोंदी पुन्हा मंजूर केलेल्या आहेत. मग, राहिलेल्या ८९ फेरफारांचे काय? “निर्णय अधिकारी एकच, फेरफारही एकच, मात्र निर्णय वेगवेगळे अशा भोंगळ कारभाराबाबत राज्याचे मुख्यमंत्री व महसूलमंत्री यांच्याकडेही याबाबत तक्रारी दाखल आहेत.
५) थेऊर तलाठी व जयश्री कवडे यांच्यासाठी तीस हजार रुपये शेतकऱ्यांकडून उकळले होते. त्याचा पुरावा ‘पुणे प्राईम न्यूज’च्या हाती लागल्याचे समजताच ते पैसे शेतकऱ्याला माफीनाम्यावर परत करण्यात आले. तसेच त्याच कार्यालयातील कोतवाल कांताराम लोंढे यांने मृत व्यक्तीच्या वारसांकडून ‘गुगल पे’वर एक हजार रुपये घेतले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पुन्हा दाद मागणार..
याबाबत बोलताना “पुणे प्राईम न्यूज”चे मुख्य संपादक जनार्दन दांडगे म्हणाले, जयश्री कवडे यांनी लोणी काळभोरच्या तलाठी पद्मिनी मोरे यांच्यासह आणखी काही तलाठ्यांना हाताशी धरुन, मागील सात ते आठ महिन्यांच्या काळात महसूल नियमांना धाब्यावर बसवत अनेक चुकीची व बेकायदेशीर कामे करुन पैसे वसुलीचा धुडगुस चालवला होता. याबाबत पुराव्यांसह जिल्हाधिकारी, हवेली प्रांत कार्यालय व हवेली तहसीलदार कार्यालयाकडे तक्रार केली होती. मात्र, याबाबतची चौकशी अद्यापही पुर्ण झालेली नाही. जयश्री कवडे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने जयश्री कवडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या काळ्या कृत्याबाबत “पुणे प्राईम न्यूज”ने घेतलेल्या भूमिकेवर मोहर उमटली आहे. पुढील दोन दिवसांत जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची भेट घेऊन, पुन्हा एकदा याबाबत दाद मागणार आहे.