पुणे : पाच दिवसांचा आठवडा, नव्या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करावी, निवृत्तीवेतन योजना अद्ययावत करावी, अधिकारी, कर्मचारी भरती करावी, अशा विविध मागण्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ इंडिया या दोन बँकांच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (ता. २७) संपाची हाक दिली आहे.
तसेच, गेल्या पाच वर्षांपासून कर्मचारी भरती करण्यात आली नाही, तसेच मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून जनधन, जीवनज्योती, जीवन सुरक्षा, फेरीवाले स्वनिधी, मुद्रा अशा केंद्राच्या विविध योजनांची अनेक कामे बँकांकडे दिली आहेत. तसेच सर्व प्रकारच्या सबसिडी बँकांमार्फत वाटण्यास सुरुवात केली.
कामगार आणि ज्येष्ठ नागरिक बँकांच्या विविध ई-सेवा वापरण्यास इच्छुक नसतात किंवा बँकेत जाऊन प्रत्यक्ष व्यवहार करण्यावर या घटकांचे प्राधान्य असते. यामुळे बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामकाजाचा ताण प्रचंड वाढला आहे.
दररोज बँक कर्मचाऱ्यांना बॅंकेची वेळ संपल्यानंतर देखील जास्त वेळ थांबावे लागले. तसेच शनिवार, रविवार अशा सुट्ट्यांच्या दिवशी देखील काम करावे लागते. रजा मिळत नाहीत, अशा विविध गोष्टींच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी संपाची हाक देण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉइज फेडरेशनचे सरचिटणीस देविदास तुळजापूरकर यांनी दिली.
दरम्यान, २७ जानेवारीचा संप केवळ बीओएम आणि बीओआय बँकांपुरता मर्यादित असून देशव्यापी असेल. तर, ३० आणि ३१ जानेवारी रोजी सर्व बँका आणि त्यांच्या सर्व कामगार संघटनांनी पुकारला आहे, असेही तुळजापूरकर यांनी सांगितले आहे.