पुणे : नागपुरात आज महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे. नागपुरातील राजभवनातील लॉनमध्ये आज हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. तर दुसरीकडे सर्वच पक्षाचे आमदार रात्रभर प्रतीक्षेत असलेले दिसून आले. अखेर मंत्री पद शपथेबाबतचा निरोप देणारा फोन इच्छुकांना केला गेला आहे. मंत्रिमंडळाच्या फाॅर्म्युल्यानुसार सर्वाधिक मंत्रिपदे हे भाजपच्या वाट्याला जाणार आहेत. तर, शिवसेनेच्या वाट्याला 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला 10 मंत्रिपदे येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच पुण्यातून तीन जण मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
मंत्रिमंडळ विस्तार करताना महायुतीच्या तिन्ही पक्षांकडून प्रादेशिक समतोल साधण्यावर अधिक जोर दिसत आहे. प्रादेशिक आणि जातीय समीकरणांसोबत पक्षवाढीसाठी फायदेशीर ठरण्याऱ्या नेत्यांना प्राध्यान्य मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपकडून आपल्या संभाव्य मंत्र्यांच्या नावाची यादी शनिवारीच देण्यात आली होती. तसेच आता एकनाथ शिंदेसह अजित पवार यांनी सुद्धा आपापल्या पक्षाची मंत्रिपदाची यादी निश्चित केली आहे.
पुण्यातून कुणाची लागली मंत्रीपदी वर्णी?
भाजपकडून कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तसेच पुण्यातील पर्वती मतदारसंघाच्या चार टर्मच्या आमदार माधुरी मिसाळ यांना प्रथमच मंत्रीपदी संधी देण्यात आली आहे. तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इंदापूर मतदारसंघाचे आमदार दत्तात्रय भरणे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.
प्रशासनाकडून नागपूरच्या राजभवनामध्ये शपथविधीची तयारी सुरु करण्यात आली आहे. आज रविवारी दुपारी ४ वाजता शपथविधी पार पडणार आहे. असे राजभवनाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
Maharashtra Cabinet Expansion,