पुणे : घरोघरी गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात झालं आहे. अशातच आता सार्वजनिक गणेशोत्सवात गणपतीचे दर्शन आणि देखावे पाहण्यासाठी रस्त्यावर गर्दी होते. त्यासाठी शहराच्या मध्यभागातील प्रमुख रस्ते सायंकाळी पाचनंतर वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे.
यंदाही शहराच्या मध्यभागात मोठी गर्दी होण्याच्या शक्यतेने वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता वाहतुकीस बंद केले जाणार आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
गुरुवारपासून (11 सप्टेंबर) शहराच्या मध्यभागात गर्दी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. विसर्जन मिरवणुकीपर्यंत शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले असल्याने नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
वाहतुकीस बंद असणारे रस्ते …
– लक्ष्मी रस्ता (हमजेखान चौक ते टिळक चौक), शिवाजी रस्ता (गाडगीळ पुतळा चौक ते देशभक्त केशवराव जेधे चौक, स्वारगेट), बाजीराव रस्ता (पूरम चौक ते अप्पा बळवंत चौक), टिळक रस्ता (मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ते हिराबाग चौक)
वाहतुकीस बंद असणारे अंतर्गत रस्ते…
– सिंहगड गॅरेज (घोरपडे पेठ ते राष्ट्रभूषण चौक ते हिराबाग चौक), दिनकरराव जवळकर चौक ते पायगुडे चौक ते हिराबाग चौक, कै. अनंत बाळकृष्ण नाईक पथ ते टिळक रस्ता, सणस रस्ता (गोटीराम भैय्या चौक, मंडई ते गोविंद हलवाई चौक), पानघंटी चौक ते गंज पेठ पोलीस चौकी, गंज पेठ ते वीर लहुजी वस्ताद तालीम चौक, गायकसाब मशीद ते सेंटर स्ट्रीट पोलीस चौकी (लष्कर), कोहिनूर चौक ते बाबाजान चौक (लष्कर), जेधे प्रासाद रस्ता, सुभानशाह दर्गा, पार्श्वनाथ चौक, शास्त्री चौक ते सोन्या मारुती चौक, गुरुनानक पथ ते हमजेखान चौक (देवजीबाबा चौक, गणेश पेठ)