पुणे: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यात मोठी चर्चा आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकारने महिलांच्या खात्यात दरमहिन्याला थेट 1500 रूपये जमा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता सरकारने अर्जाची छाननी करण्याचा निर्णय घेतला आहे. या छाननीत ज्या लाडक्या बहिणी निकषात बसणार नाहीत, त्यांना 1500 रूपये मिळणार नाहीत. पण सरकारने 2100 रूपये दरमहा देण्याची घोषणा केली होती. मात्र या दरम्यान जर अर्ज बाद झाला तर 2100 रुपये तर नव्हेच 1500 रूपयेही मिळणार नाही, अशी अवस्था महिलांची होणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत महिलांच्या खात्यात 1500 रूपयांचे सहा हप्ते जमा झाले होते. निवडणुकीनंतर सरकारने लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता दिला होता. या हप्त्यात महिलांच्या खात्यात फक्त 1500 रूपयेच जमा झाले आहेत.पण सरकारने निवडणुकीनंतर 2100 रूपये खात्यात जमा करण्याची घोषणा केली होती. मात्र सरकारने अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही आहे.त्याऐवजी अर्जाची छाननी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अर्जाच्या छाननीसाठी काही निकष ठरवण्यात आले आहेत. हे निकष खालीलप्रमाणे आहेत.
अर्ज बाद होण्याचे निकष काय?
कुटुंबाचे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर
घरात कोणाच्याही नावावर चारचाकी वाहन असेल तर
शासकीय नोकरी असताना घेतलेला योजनांचा लाभ
अगोदारपासून सरकारी योजनेचा लाभ घेणारे असतील तर त्यांना लाभ मिळणार नाही
ज्या महिला महाराष्ट्रातून लग्न करुन दुसऱ्या राज्यात किंवा देशाबाहेर गेल्या त्यांनाही लाभ मिळणार नाही
ज्यांनी महिलांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही अर्ज भरले त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत.
वरील निकष डावलून जर काही महिला या योजनेचा लाभ घेत असतील.तर छाननीत त्यांचा अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर अर्ज बाद झाला आणि सरकारने हफ्ता 2100 केला तर महिलांची मोठी पंचायत होणार आहे. कारण महिलांना 2100 रूपये सोडाच 1500 रूपयेही मिळणार नाहीत.