पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील फायरब्रॅंड नेते वसंत मोरे यांनी काल पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पुण्यातील मनसेमधील अतंर्गत राजकारणाला कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलं. तसेच आपल्याला डावलंल जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. राजीनाम्यानातर अनेक कार्यकर्त्यांनीदेखील धडाधड राजीनामे दिले. त्यानंतर वसंत मोरे कोणत्या पक्षात जाणार याच्या चर्चा रंगल्या. मात्र दोन दिवसांत मी सगळं जाहीर करेन असं ते राजीनामा देताना म्हणाले आहेत.
तर मी अपक्ष लोकसभा निवडणूक लढवणार : वसंत मोरे
पुढे बोलताना वसंत मोरे म्हणाले की, सगळ्या पक्षात सध्या लोकसभेसाठी उमेदवारांची मोठी रांग लागलेली आहे. वेळ आली तर मी अपक्षदेखील लोकसभा निवडणूक लढवणार, असं वसंत मोरेंनी स्पष्ट केलं आहे. मनसेत माघारी जाणार का? विचारल्यावर माघारी फिरुन मला साहेबांना फसवायचं नाही आहे, असं ते म्हणाले आहेत.
वसंत मोरेंना मुरलीधर मोहोळांचा फोन
वसंत मोरे म्हणाले की, मी राजीनामा दिल्यानंतर अनेकांना दु:ख झालं आहे. अनेक लोक मला मिळत असलेली वागणूक बघत होते. ते निरिक्षण करत होते. राजीनामा दिल्यावर काही वेळात मला मुरलीधर मोहोळांचा फोन आला. मुरलीधर मोहोळ आणि मी जुने चांगले मित्र आहोत. त्यामुळे मुरलीधर मोहोळांनी माझं सांत्वन करण्यासाठी फोन केला होता. तात्या तुझ्यासारख्या कार्यकर्त्यासोबत हे चुकीचं झालं, असं मोहोळ म्हणाले. मोहोळांनी मला संघटनेसाठी फोन नाही केला मित्र म्हणून फोन केला, असं वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं आहे.