पुणे : वाघोलीतील एका ज्वेलर्सच्या दुकानाचे शटर उचकटून सोन्याचे व चांदीचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सराईत गुन्हेगाराला लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने त्याच्या साथीदारांच्या मदतीने घरफोडी करुन ३ लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास तात्याश्री कॉम्प्लेक्स मधील गणेश गोल्ड अँड इमिटेशन ज्वेलरी या दुकानात घडली.
याबाबत शाम दामोदर वैष्णव (वय-४० रा. हॅप्पी होम सोसायटी, आव्हाळवाडी रोड, वाघोली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून सोनुसिंग जितेंद्र जुनी (वय-२५ रा. रामटेकडी, हडपसर) याला वानवडी परिसरातून अटक केली आहे. तर त्याचे साथीदार सनीसिंग जितेंद्र सिंग जुनी व अशुसिंग टाक यांच्यावर गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार आहेत. दरम्यान, आरोपी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती लोणीकंद पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वैष्णव यांचे वाघोली येथील तात्याश्री कॉम्प्लेक्समध्ये ज्वेलरीचे दुकान आहे. सोमवारी रात्री साडेनऊ वाजता वैष्णव यांनी दुकान बंद करून घरी गेले. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास आरोपींनी दुकानाचे लोखंडी ग्रिलचे कुलूप तोडून दुकानाचे लोखंडी शटर मध्यभागी उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातील २ लाख ९५ हजार रुपये किमतीचे १४.३८० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ३ किलो ७०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, डिव्हीआर मशीन चोरून नेली.
फिर्यादी दुसऱ्या दिवशी दुकानात आले असता दुकानाचे कुलूप तुटल्याचे आढळून आले. दुकानात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करुन आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली. आरोपी सोनुसिंग जुनी याला मंगळवारी रात्री अटक केली असून त्याच्या साथीदारांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.