बापू मुळीक
सासवड : सासवड पोलिस ठाण्याचे 9 ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग सुरु होते. यावेळी पीएमटी बस स्टॉप जवळ संशयित दुचाकी आढळल्याने त्याचा पाठलाग करून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल तपासाअंती परिसरातील वाहन चोरीचे ७ गुन्हे उघडकीस आणण्यात सासवड पोलिसांना यश आले आहे. ओंकार राजेंद्र जगताप (वय -23) असं आरोपीचे नाव आहे.
9 ऑगस्ट रोजी पोलीस कर्मचारी सासवड पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत होते. यावेळी सासवड येथील पीएमटी बस स्टॉप जवळ त्यांना एक व्यक्ती दुचाकीवर बसलेला दिसला. त्या दुचाकीवर चुकीची नंबरप्लेट असल्यामुळे पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी करण्यास सुरूवात केली. त्यावेळी त्याने उडवा उडवीची उत्तरे देण्यास सुरूवात केली.
पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता ती दुचाकी अविनाश मानसिक जगताप यांच्या मालकीची असून 30 जुलै रोजी करा अपार्टमेंट संगमेश्वर मंदिर येथून चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्याने सासवड, उरुळी देवाची, हडपसर या ठिकाणाहून सात गाड्या चोरल्याचे कबुल केली. पुढील तपास सासवड पोलीस करत आहेत.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी रात्रीच्या वेळी चोरांना आळा बसावा यासाठी पोलीस स्टेशनला सतर्कपणे पेट्रोलिंग करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच संशयित आरोपी, गुन्हेगार यांच्याबाबत पडताळणी करून प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने पेट्रोलिंग करताना वरिष्ठाच्या आदेशाचे पालन करून ही कारवाई करण्यात येत आहे.