भिगवण (पुणे) : दिवाळीच्या तोंडावर चोरट्याांचा धुमाकूळ सुरू असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. पश्चिम भागात दोन दिवसांमध्ये तीन गावांतील पाच ठिकाणी चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. म्हसोबाचीवाडी (ता. इंदापूर) येथे रविवारी (दि.२७) हरिदास चांदगुडे यांचे घर फोडून चोरट्यांनी १५ हजार रोख रकमेवर डल्ला मारून दुचाकीची चावी चोरून नेली. त्याच दिवशी शिंदेवाडी येथील दत्तात्रेय शिवराम यलजाळे यांच्या येथे घरफोडी करून दागिन्यांसह रोख रक्कम चोरट्याने लंपास केली. तर, लाकडी येथे दोन दिवसांत तीन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या.
त्यामध्ये लाकडी (ता. इंदापूर) येथील बापू श्रीरंग वणवे यांची मोटरसायकल चोरट्यांनी पळवली, तर इंदापूर पंचायत समितीच्या माजी सदस्या शीतल दादासाहेब वणवे यांच्या घरी दरवाजा तोडून गळ्यातील दागिन्यांसह सुमारे पाच तोळ्यांहून अधिक सोन्याचे दागिने व पंधरा हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. तसेच, केशव नाना वनवे यांच्या घरी चोरी झाली.
ऐन सणासुदीच्या तोंडावर चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. भिगवण व वालचंदनगर या दोन पोलीस ठाण्यांच्या हद्दीमधील या तीन गावांमध्ये गेल्या दोन दिवसांत या चोरीच्या घटना घडल्या आहेत. दोन्ही पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा करून गुन्हा दाखल केला. दोन चोरीच्या घटनेचा पोलीस कसून चौकशी करीत आहेत. नागरिकांनी रात्रीच्या वेळेस सतर्क राहण्याच्या सूचना पोलिसांनीही केल्या आहेत. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांना बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.