हडपसर: रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी हडपसर येथील गाड्यांसाठी प्रसिद्ध असलेले चितांमणी मोटर्सचे दुकान फोडल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता.१) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या दुकानातून चोरट्यांनी सुमारे साडे दहा लाखांच्या दोन गाड्या लंपास केल्या आहेत. याप्रकरणी रिजवान शेख (वय ४३, रा. नानापेठ, पुणे) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रिजवान शेख यांचे सोलापूर रस्त्यावरील शंकर मठाजवळ चितांमणी मोटर्स नावाने चारचाकी गाड्यांचे विक्रीचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे शेख हे रविवारी (ता.३१ मार्च) संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले होते.
दरम्यान, फिर्यादी शेख हे दुसऱ्या दिवशी सोमवारी (ता.१ एप्रिल) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी गेले असता, त्यांना दुकानाच्या दरवाजाचे लॉक तुटलेले आढळून आले. फिर्यादी यांनी आत जाऊन पहिले असता, कपाटातील दोन चारचाकी गाड्यांच्या चाव्या आढळून आल्या नाहीत.
त्यानंतर फिर्यादी यांनी गाड्या तपासल्या असता, त्यांना दोन गाड्या आढळून आल्या नाहीत. तेव्हा फिर्यादी यांच्या लक्षात आले की, चोरट्यांनी दुकान फोडून साडे दहा लाखांच्या दोन गाड्यांची चोरी केली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक बर्गे करीत आहेत.