लोणी काळभोर : तगडी पोलिस यंत्रणा असतानाही गेल्या दहा दिवसांपासून चोरट्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या व छोट्या मोठ्या चोऱ्या करून धुमाकूळ घातला आहे. या चोऱ्यांमुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे गुन्हे प्रकटीकरण शाखा नेमकी काय करते? ती योग्य काम करत नसेल, तर ती हवी कशाला? अशी चर्चा दबक्या आवाजात नागरिकांमध्ये सुरु आहे.
वडकी (ता. हवेली) येथील दोन सख्ख्या भावांचे फ्लॅट फोडून चोरट्यांनी पावणे चार लाखांचा मुद्देमाल २ ऑगस्टला चोरून नेला होता. त्यानंतर चोरट्यांनी दुसऱ्या दिवशी २ ऑगस्टला कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील स्टार सिटी परिसरात बंगला फोडला होता. या घरफोडीतून चोरट्यांनी रोख रकमेसह ४० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. चोरीचे हे सत्र सुरु असतानाच, चोरट्यांनी लोणी स्टेशन येथील नादब्रम्हा इडलीचे दुकान फोडले. तसेच मारुती मंदिराच्या जवळील एका खोलीतून रोकड व नवीन कपडे घालून भुरटे चोर पसार झाले.
एवढे सारे चोरीचे सत्र सुरु असतानाच, चोरट्यांनी लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील शांतीकिरण सोसायटीतील सदनिका फोडल्याचा प्रकार शुक्रवारी (ता.९) उघडकीस आला आहे. या घटनेत चोरट्यांनी सोन्याचे दागिने, मोबाईल, पेन, कपडे व रोख रक्कम असा सुमारे २ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. यानंतर काही केले, तरी चोऱ्यांचे सत्र थांबत नसल्याचे दिसून येत आहे.
एखादा गुन्हा घडला, तर त्या ठिकाणची सर्व माहिती घेऊन तत्काळ त्या आरोपीपर्यत पोहोचण्याचे काम डीबीचे आहे. मात्र, लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील डीबी पथकाची कामगिरी काहीच नाही. तगडी पोलिस यंत्रणा असतानाही लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अशा वाढत्या घटनांमुळे लोणी काळभोर परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. तर या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर आपणच सावध होऊन आपल्या वस्तूंची काळजी घ्यावी, अशी चर्चा नागरिकांमध्ये चांगलीच रंगली आहे.
सीसीटीव्ही असतानाही आरोपी अद्याप फरार
घराच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे महत्वाचे आहेत. त्यामुळे अनेक नागरिक घरावर लक्ष देण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवितात. मात्र, कदमवाकवस्ती व लोणी काळभोर येथील घरांवर सीसीटीव्ही कॅमेरे असतानादेखील चोरट्यांनी धाडसी चोरी व घरफोडी केल्या आहेत. चोरट्यांनी तोंडाला रुमाल, डोक्यात माकड टोपी, मफलर गुंडाळलेला आहे. तसेच जर्किंग व रेनकोटचा वापर केला आहे. या चोरींच्या घटनेत चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. मात्र, लोणी काळभोर पोलिसांना अद्यापही या गुन्ह्यांची उकल करण्यास यश आले नाही. त्यामुळे अद्यापही चोरटे फरार आहेत.