पुणे : पुण्यातील सदाशिव पेठेतील खजिना विहीर विठ्ठल मंदिरात चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील कपाटाचे कुलूप तोडूनमूर्ती, तसेच चांदीचे मखर चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना ८ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गौरव ज्ञानेश्वर सिन्नरकर (वय ३८, सदाशिव पेठ खजिना विहिर चौक पुणे) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदाशिव पेठेतील खजिना विहीर चौकात श्री विठ्ठल मंदिर आहे. आठ मार्च रोजी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास तीन अनोळखी इसम दुचाकीवरून खजिना विहीर विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात आले. त्यांनी मंदिराच्या मुख्य दरवाजाचे आणि मंदिरातील गाभाऱ्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश केला.
मंदिरातील कपाटाचेही कुलूप तोडले आणि मंदिराच्या गाभाऱ्यातील चांदीची विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती, चांदीची गणपतीची मूर्ती, तुळजाभवानीची पितळेची मूर्ती आणि भिंतीवर लावलेलं चांदीचं मखर अशा एकूण ४१ हजार ५०० रुपयांच्या वस्तू घेऊन चोरटे दुचाकीवरुन पसार झाले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मंदिराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले असून, पोलीस उपनिरीक्षक फरताडे अधिक तपास करत आहेत.