पुणे : विद्देचे माहेरघर असलेल्या पुण्यात चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. काही दिवसापूर्वी सदाशिव पेठेतील प्राचीन विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली होती. हि घटना ताजी असतानाच चोरट्यांनी आणखी एका मंदिरात चोरी करुन दानपेटीत असलेली रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली आहे. हा प्रकार गुरुवारी २८ मार्च रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास शनिपार मित्र मंडळ ट्रस्टच्या महादेव मंदिरात घडला आहे.
याबाबत निखील मधुकर जाधव (वय-३२ रा. सदाशिव पेठ, पुणे) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून २५ ते ३० वर्षे वयोगटातील चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील सदाशिव पेठेतील शनिपार मित्र मंडळ ट्रस्टच्या महादेव मंदिरात गुरुवारी पहाटे अज्ञात चोरट्याने प्रवेश केला. चोरट्याने लोखंडी सळईने दानपेटीचे कुलुप तोडून त्यामधील दोन ते तीन हजार रुपयांची रोकड पळवली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपाली भुजबळ, पोलीस निरीक्षक गुन्हे अरुण घोडके, सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम निंबाळकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
खजिना विहीर विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून प्राचीन चांदीच्या मुर्ती चोरी
सदाशिव पेठेतील प्रसिद्ध खजिना विहीर विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून प्राचीन मूर्ती चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली होती. आठ मार्च रोजी रात्रीच्य सुमारास तीन अज्ञात व्यक्तीने मंदिराचे कुलूप तोडून गाभाऱ्यात प्रवेश केला. त्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात असलेल्या कपाटाचे कुलुप तोडून प्राचीन चांदीच्या मुर्ती चोरून नेल्या घटना घडली आहे.