पुणे : पुण्यातील सदाशिव पेठेत असलेल्या रमेश डाईंग नावाच्या दुकानात चोरी केल्याची घटना घडली आहे. पूर्वी दुकानात काम करणाऱ्या कामगाराने साथीदाराच्या मदतीने दुकानातून तब्बल साडे ३ लाखांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. ही घटना ४ मे रोजी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास सदाशिव पेठेतील ‘रमेश डाईंग’ मध्ये घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे.
सलमान मुजावर (रा. दापोडी), निखिल राजारम पास्टे (वय-२१ रा. जनता वसाहत, पर्वती पायथा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी प्रथमेश मिलिंद शहा (वय-२८, रा. जयंती बंगला, मोतीबाग सोसायटी, प्रेम नगर, मार्केट यार्ड) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी शहा यांचे सदाशिव पेठेत रमेश डाईंग नावाने बॅग, ट्रॉली बॅग, उन्हाळी कपडे, छत्री, पावसाळी रेन कोट विक्रीचे दुकान आहे. तसेच त्यांचे सदाशिव पेठेत गोदाम देखील आहे. आरोपींनी बनावट चावीने गोदाम उघडले. त्यातील विविध कंपन्या, विविध मॉडेलच्या ३० ट्रॉली बॅग, २६ डफल बॅग, १२ सॅक, ३६ छत्र्या असा एकूण ३ लाख २८ हजार ४७८ रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.
याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी फिर्यादी यांनी पोलिसांना सांगितले की, सीसीटीव्हीमध्ये २ जण गोदामातून बाहेर पडताना दिसले. फिर्यादी यांनी सादर आरोपींना काही महिन्यापूर्वीच कामावरुन काढून टाकले होते. पोलिसांनी आरोपींना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे करत आहेत.