सागर जगदाळे
भिगवण : इंदापूर तालुक्यातील मदनवाडी ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या विरवाडी नंबर 2 मधील जावलसिध्दनाथ मंदिरातून अज्ञात चोरट्याने देवाच्या अंगावरील 70 हजार रुपयाचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. मला देवाला नवस बोलायचा आहे, अशी बतावणी करून चोरट्याने मंदिरात प्रवेश करून दागिने चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. 6) रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याबाबत अभिमन्यु पर्वती बंडगर (वय-51 वर्षे, धंदा-शेती, रा. विरवाडी नं 2 मदनवाडी, ता. इंदापुर, जि. पुणे) यांनी भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बंडगर यांच्या मालकिचे श्री. जावलसिध्दनाथ मंदिर आहे. या मंदिरात रविवारी अंगात लाल शर्ट व काळया रंगाची पॅन्ट घातलेला अज्ञात व्यक्तीने “मला देवाला नवस बोलायचा आहे, मला चावी दया, असे म्हणून फिर्यादी बंडगर यांच्या आईचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर मंदीराची चावी त्यांच्याकडून घेवुन मंदिरातील देवाच्या अंगावरील 20 हजार रूपये किंमतीची चांदीची छत्री अंदाजे वजन 350 ग्रॅम, 5 हजार रूपये किंमतीची चांदीची चिलीम 10 ग्रॅम, 10 ग्रॅम वजनाची 5 हजार रूपये किंमतीची देवाच्या गळयातील चांदीची चैन, 30 हजार रूपये किंमतीचे देवाच्या गळ्यातील सोन्याचे 6 मनी व डोरले वजन 5 ग्रॅम, देवाच्या झोळीत असलेली 10 हजार रोख रक्कम, असा एकुण 70 हजार रुपये किंमतीचे दागिने विश्वासघात करून घेवुन गेला आहे. सदर अज्ञात इसमाविरुध्द भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार शैलेश हंडाळ पुढील करीत आहे