पुणे : पुण्यातील प्रसिद्ध पेशवेकालीन ओंकारेश्वर मंदिराच्या गाभार्यातील दान पेटी फोडून त्यातील रक्कम चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ६ आॅक्टोबर रोजी पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबत कौस्तुभ उल्हास गाडे (वय-४०, रा. शनिवार पेठ, ओंकारेश्वर मंदिराशेजारी) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकारेश्वर मंदिर हे पेशवेकालीन मंदिर आहे. या मंदिराला दोन प्रमुख दरवाजे आहेत. त्यातील नदीकाठी असलेल्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. त्यानंतर त्याने गाभार्यात प्रवेश केला. तेथील दान पेटीचे कुलूप तोडून त्यातील सुमारे ६ हजार रुपये चोरुन नेले.
सकाळी सहा वाजता मंदिर उघडल्यानंतर चोरी झाल्याचे उघडकीस आले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक घोडके, सहायक पोलीस निरीक्षक पवार, गायकवाड यांनी मंदिराला भेट देऊन पाहणी केली. मंदिरात सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत.
सीसीटीव्हीमध्ये चोरटा दिसून येत आहे. मात्र, त्याने आपली ओळख पटू नये, म्हणून अगोदरच संपूर्ण चेहरा झाकला असल्याचे दिसत आहे. पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान चोरीचा हा प्रकार घडला असावा, असे सीसीटीव्ही फुटेज वरुन दिसून येत आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून पोलीस उपनिरीक्षक पाटील पुढील तपास करीत आहेत.