लोणी काळभोर : विहिरीत उडी मारून २७ वर्षीय तरुण अडकल्याची धक्कादायक घटना फुरसुंगी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गणेश नगर परिसरात नुकतीच घडली. हडपसर अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर तरुणाला विहिरीतून बाहेर काढून जीवनदान दिले. त्यामुळे अग्निशामक दलाच्या जवानांचे फुरसुंगी व परिसरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.
कमलेश इरपाची (वय २७) असे विहिरीतून सुखरूप बाहेर आलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कैलास हरपळे यांची गणेश नगर परिसरात शेती आहे. या शेतीमध्ये त्यांची खासगी मालकीची विहिर आहे. दरम्यान, रविवारी (ता. ७) संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विहिरीत कमलेश इरपाची नावाच्या व्यक्तीने उडी मारल्याची माहिती हरपळे यांना मिळाली. माहिती मिळताच, हरपळे यांनी तातडीने हडपसर अग्निशामक दलाला कळविले.
या घटनेची माहिती मिळताच, अग्निशामक दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी तरुण बचावासाठी आरडा-ओरड करत होता. जवानांनी त्वरित स्टिंग ऑपरेशन करून तरुणाला रस्सी व सीडीच्या सहाय्याने तब्बल दोन तासांच्या प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर काढले.
ही कामगिरी हडपसर अग्निशामक दलाचे अधिकारी प्रमोद सोनवणे, तांडेल शौकन शेख, चालक नारायण जगताप, गणेश पराते, छगन मोरे, मदतनीस तारू यांनी केली. या कामगिरीमुळे अग्निशामक दलाच्या जवानांचे नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.
दरम्यान, अग्निशामक दलाच्या जवानांनी याबाबत हडपसर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एन. जाधव यांना माहिती दिली आहे. मात्र, कमलेश इरपाची याने विहिरीत उडी का मारली, याचे कारण समजू शकले नाही. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.