पुणे : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तरुणाचा खून करुन एका पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये मृतदेह ठेवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. इम्रान यासीन पटेल (वय-२४, रा. उंड्री) असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी इम्रान याचा चुलत भाऊ आसीफ महेबुब पटेल (वय-२९, रा. थेऊर फाटा, लोणी काळभोर) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरून हडपसर पोलिसांनी खूनाचा प्रकार उघडकीस आणला असून आरोपीला अटक केली आहे. निजामुद्दीन पटेल (वय-३०, रा. हांडेवाडी, हडपसर) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रान पटेल हा मुळचा कर्नाटकातील गुलबर्गा येथील राहणारा आहे. तो ४ वर्षांपूर्वी पुण्यात राहायला आला होता. इम्रान हा वॉटर प्लँट बसविण्याचे काम करत होता. त्यातील वादातून त्याचा खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात निदर्शनास आले आहे. हडपसरमधील हिंगणे मळा येथील विसर्जन घाटावर एक कचरा वेचक मुलगा कचर्यातून काही वस्तू मिळताहेत का नाही याची पाहणी करत होता. त्यावेळी त्याला कचर्यात एक पुठ्ठ्याचा बॉक्स आढळून आला. तो जड लागत असल्यामुळे त्याने तो तेथेच उघडला.
दरम्यान, त्या मुलाला त्यात एका पुरुषाचा मृतदेह आढळला. कचर्यात मृतदेह आढळून आल्याचे समजताच अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त आर राजा, सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख , वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्यासह पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी माहिती दिली की, पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये हात पाय मुडपून त्याचा मृतदेह ठेवण्यात आला होता. तर दुसरीकडे खून करुन ओळख पटू नये, म्हणून तेथे आणून टाकल्याची माहिती समोर आली आहे. गंभीर स्वरूपाची मारहाण करुन त्याचा खून केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्याच्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी सोशल मीडियापासून सर्व ठिकाणी फोटो प्रसारित केले आहेत. त्यातून शनिवारी सायंकाळी थेऊर फाटा येथे राहणार्या आसीफ पटेल याने तो आपलाच चुलत भाऊ असल्याचे ओळखून सांगितले आहे. फिर्यादी तसेच इतरांच्या मदतीने मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितापर्यंत पोलीस पोहचले असून सर्व बाबी तपासून पाहिल्या जात आहेत. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.