पुणे : आजकाल बाहेरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवणे अवघड झाले आहे. आपल्या नजरेसमोर राहूनच काहीजण आपल्याला धोका देतात. अशीच एक घटना पुणे शहरात घडली आहे. एका घरात लहान मुले सांभाळण्यासाठी तिथे काम करण्याच्या बहाण्याने घरातील दागिने चोरी करणाऱ्या महिलेला येरवडा पोलिसांनी जेरबंद केले आहे.
याप्रकरणी सायली संतोष कार्वे (वय 22,रा. मु. पो.किन्हई, ता. कोरेगाव, सातारा) या महिलेला अटक करण्यात आली आहे. त्या महिलेकडून अशा प्रकारचे दोन गुन्हे उघडकीस आलेले आहेत. या गुन्ह्यातील 17 लाख रुपये किमतीचे 26 तोळे सोन्या- चांदीचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
या घटनेबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणीनगर येथील उच्चभ्रू सोसायटीतून 26 तोळे सोन्या-चांदीचे दागिने मोलकरणीने चोरून नेल्याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना हा गुन्हा घरात काम करणाऱ्या मोलकरणीने केला असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस हवलदार तुषार खराडे, किरण घुटे, अंमलदार सुशांत भोसले यांना मिळाली होती. आरोपी महिला हि तिच्या मूळ गावी कोरेगाव सातारा येथे गेली असल्याचे समजल्यानंतर तात्काळ येरवडा पोलिसांच्या तपास पथकासह महिला पोलीस अंमलदार शामलता देवकर यांनी संशयित महिला सायली कार्वे हिला ताब्यात घेतले.
या प्रकरणी अधिक तपास केले असता हा गुन्हा सायली कार्वे या महिलेने स्वत:च केले असल्याची कबुली दिली. अशाच प्रकारे आंबेगाव येथील एका घरात सुद्धा तिने साडेसहा तोळे सोन्याचे दागिने चोरी केल्याचे सांगितले. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. या महिला आरोपीकडून दोन्ही गुन्ह्यातील सुमारे 17 लाख रुपये किमतीचे सुमारे 26 तोळे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील, श्रेणी उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे, हवालदार गणपती थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे,किरण घुटे, कैलास डुकरे, पोलीस नाईक सागर जगदाळे, अंमलदार अनिल शिंदे, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले,विठ्ठल घुले यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.