राजेंद्रकूमार शेळके
पौड : मुळशी तालुक्यातील कुस्तीला उर्जितावस्था प्राप्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे प्रसिद्ध पैलवान, क्रिडा शिक्षक, कुस्ती पंच, वस्ताद अशा अनेक नावांनी प्रसिद्ध असलेले प्रा. पै. सागर गोपीनाथ तांगडे (वय ३८) यांचे गुरूवारी (ता. २१) दुखःद निधन झाले. त्यांच्या जाण्याने कुस्तीगीर हळहळ व्यक्त करीत आहेत. ग्रामीण भागात कुस्तीचा प्रसार करून पैलवान तयार करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत होते.
विजेचा शॉक लागल्याने सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सागर तांगडे यांचं आकस्मिक निधन झाले. ते पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पिरंगुट इंग्लिश स्कूलमध्ये कुस्तीपटू, राजकीय, सामाजिक, क्रिडा, स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे क्रिडा शिक्षक म्हणून कार्यरत होते. कुस्ती क्षेत्रातील त्यांचे योगदान मोलाचे होते. महाराष्ट्रातील मानाची असलेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा तसेच अनेक राज्य व राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत त्यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी केली आहे. अनेक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट पंच म्हणून देखील त्यांचा गौरव करण्यात आला होता.
भरे (ता. मुळशी) येथील क्रीडा संकुल येथे मुळशी तालुक्यातील ग्रामीण भागातील मुलांना त्याचबरोबर मुलींना मोफत कुस्तीचे प्रशिक्षण ते देत होते. त्यांच्या या कार्यामुळे अनेक मुले-मुली राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धामध्ये चमकले आहेत. कुस्ती क्षेत्रातील व क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल अनेक सामाजिक संस्थांच्या वतीने त्यांना गौरविण्यात आले होते. लवळे गावातील ग्रामदैवताच्या उत्सवानिमित्त आयोजित करण्यात येत असलेल्या कुस्ती आखाड्यात तसेच रोटमलनाथ केसरी कुस्ती स्पर्धेत त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी सातत्याने लाल मातीची सेवा केली. सेवेमुळे त्यांच्या जाण्याने कुस्तीगीर हळहळ व्यक्त करीत आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे.