-विजय लोखंडे
वाघोली : येथील वाघेश्वर मंदिराच्या बाहेरील दगडी वज्रलेपाचे काम मागील एक महिन्यापासून सुरु होते. ते काम पूर्णत्वाकडे आले आहे. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी काम पूर्ण होणार असून वाघेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांना मंदिर खुले करण्यात येणार असल्याची माहिती, वाघेश्वर मंदिर विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र सातव पाटील दिली आहे.
पुणे-नगर महामार्गावर असलेल्या वाघोली गावाला स्वंयभू पुरातनकालीन वाघेश्वर मंदिर हे वाघोली गावास ऐतिहासिक वारसा म्हणून लाभले आहे. वाघोली विकास प्रतिष्ठानाच्या वतीने अतिशय चांगल्या पद्धतीने मंदिराची देखभाल केली जाते. पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराच्या बाहेरील दगडी कामाला वज्रलेप करण्याचे काम प्रतिष्ठानने 22 जून रोजी हाती घेतले होते. दरम्यान वज्रलेपाच्या कामासाठी भाविक भक्तांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन वाघोली विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र सातव पाटील, उपाध्यक्ष रामभाऊ दाभाडे यांच्यासह प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत भाविकांनी सढळ हातानी मदत केली. मंदिराच्या वज्रलेपाचे काम सोमवार पर्यंत पूर्ण होत आहे.