पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेत एक धक्कादायक घटना घडली आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एका आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा दूर्दैवी मृत्यू झाला आहे. जिन्याच्या रेलिंगवर घसरगुंडी खेळताना ही दुर्दैवी घटना घडली, अशी माहिती शाळेतील अन्य विद्यार्थ्यांनी पोलिसांना दिली.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सार्थक कांबळे असे मृत पावलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. सार्थक काळेवाडीत परिसरात वास्तव्याला होता. हुतात्मा चाफेकर विद्यामंदिर शाळेत तो आठवीच्या वर्गात शिकत होता. साधारण दहा वाजण्याच्या सुमारास सार्थक तिसऱ्या मजल्याच्या पायऱ्यांवरील लोखंडी रेलिंगवर खेळत होता.
दरम्यान, रेलिंगवर खेळताना तोल जाऊन पडू शकतो, याची कल्पना त्याच्या मित्राला होती. मित्राने त्याला, तू इथे खेळू नकोस, खाली पडशील, तुला लागेल, असे सांगत खेळण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न देखील केला होता. मात्र, मित्राचा सल्ला ऐकता, सार्थक त्याच्याच धुंदीत खेळत होता. अचानकपणे रेलिंगवरून त्याचा तोल गेला आणि तो थेट तळमजल्याच्या डक्टमध्ये पडला, अशी माहिती सार्थकच्या मित्रांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
सार्थक तिसऱ्या मजल्यावरून तळमजल्याच्या डक्टमध्ये पडल्याने त्याला जोराचा मार लागला. अपघाताची माहिती कळताच सार्थकला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. सार्थकच्या मृत्युमुळे शाळा परिसर तसेच काळेवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.
या घटनेचा अधिक तपास चिंचवड पोलीस करत आहेत.