पुणे : पुणे महापालिकेच्या कुत्रा पकडण्याच्या गाडीत आलेल्या तिघांनी महिलेला मारहाण करुन विनयभंग केल्याची धक्कादायक घटना वडगाव शेरी येथील ब्रम्हा सनसिटी सोसायटीत शनिवारी (ता.११ फेब्रुवारी) घडली आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी एका ४८ वर्षाच्या महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कपिल पटवर्धन (रा. एरंडवणे), निताशा पंकज सक्सेना (रा. विमाननगर) आणि सौम्या मामुनुरु (रा. वडगाव शेरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव शेरी परिसरात भटकी कुत्री खूप झाली. त्यातून एका कुत्र्याने लहान मुलाचा चावा घेतला होता. त्याविरोधात स्थानिक नागरिकांनी आंदोलनही केले होते. त्यामुळे महापालिकेची कुत्रा पकडणारी गाडी आली होती. त्यावेळी गाडीत आलेल्या तिघांनी सोसायटीची परवानगी न घेता सोसायटीत प्रवेश केला. तेव्हा त्यांनी सुरक्षारक्षकाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, सोसायटीत घुसल्यावर आरोपींनी महिलांचे मोबाईलमध्ये शुटींग केले. त्याचा जाब फिर्यादी यांनी विचारला असता, आरोपी कपिल पटवर्धन याने फिर्यादीशी अश्लिल वर्तन करत त्यांचा विनयभंग केला. त्यानंतर गाडी माघारी घेऊन जात असताना, गाडीचे चाक फिर्यादीच्या पायावरुन गेले. तसेच इतर महिलांना हाताने मारहाण करुन आर्वाच्या भाषेत शिवीगाळ केली. असे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आळेकर करीत आहेत.