पुणे : पुण्यातील मुळशी तालुक्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चोराचा पाठलाग करत तरुणाने त्यांना पकडले. मात्र, दमछाक झाल्याने त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना ८ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे. अक्षय अंकुश ओबळे (वय-२७) असे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने मुळशी तालुक्यामध्ये शोककळा पसरली आहे. शरद काळे असे पकडण्यात आलेल्या चोराचे नाव आहे.
नेमकं काय घडलं?
पौड फाटा परिसरात असलेल्या विठ्ठलवाडी फाटा येथे राजेंद्र ओंबळे हे मंगळवारी रात्रीच्या सुमारास झोपले होते. त्यावेळी घराच्या मागच्या बाजूने कुणीतरी आपल्या घरात शिरल्याचा त्यांना भास झाला. त्यानंतर अक्षय यांनी शेजारी राहणाऱ्या नागरिकांना याबद्दल कल्पना दिली. त्यानंतर चोराला पकडण्यासाठी तेथील नागरिक सरसावले.
शरद काळे याला पकडण्यासाठी नागरिक त्याचा पाठलाग करु लागले. त्यामध्ये अक्षयचा समावेश होता. पाटलाग करून या चोराला पकडल्यानंतर त्याला बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर चोराला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. दरम्यान, या चोराचा पाठलाग करत असताना अक्षयने आपल्या जीवाची परवा न करता जोरात पळत जाऊन त्याला पकडले होते. त्यामुळे त्याची दमछाक झाली. घरी आल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच अक्षयचे निधन झाल्याचे डॉक्टरां सांगीतले.