पुणे : पुण्यात कधी काय घडेल हे सांगताच येत नाही. अनेकदा वेगवेगळ्या घटना पुणेकरांनी अनुभवल्या आहेत. अशातच आता आणखीन भर पडली आहे. आता पुण्यातील जे. एम. रोड परिसरात चोरांचा फिल्मी ड्रामा पहायला मिळाला आहे.
तीन चोर चक्क पार्किंगमध्ये लपले आहेत, आणि चोरांना पकडण्यासाठी फायर ब्रिगेड पोलीस आणि पुणेकरांनी तुफान गर्दी केली आहे. घडलेल्या या घटनेनं पुन्हा एकदा नागरीकांच लक्ष वेधून घेतलं आहे. ही घटना पुण्यातील सदगुरु जंगली महाराज रस्त्यावर घडली आहे.
नेमकं प्रकरण काय?
पुणे शहरातील सदगुरु जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या मेकॅनिकल पार्किंग मध्ये तीन चोर वरती लपले आहेत. त्या चोरांना पकडण्यासाठी फायर ब्रिगेड, पोलीस पार्किंगच्या खाली उभे आहेत. गेल्या दोन ते तीन तासापासून हा सर्व नाट्यमय प्रकार सुरू आहे. दरम्यान, चोरांना खाली येण्याची विनंती पोलीस करत आहेत.
मात्र, चोर घाबरून खाली येत नाहीत. या प्रकारामुळे नागरिकांनी याठिकाणी मोठी गर्दी केली आहे. मेकॅनिकल पार्किंग मधील लाखो रुपयाचे लोखंड कॅापर आणि वायर चोरीला गेले असून आता चोरांना पकडण्यासाठी पोलीसांचं काम सुरु आहे.