पुणे : गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा उपप्रकार असलेल्या ‘जेएन १’च्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत झालेल्या जीनोम सिक्वेन्सिंग तपासणीमध्ये सर्वाधिक नमुने पुणे जिल्ह्यातील आहेत. यामुळे राज्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद पुण्यात झाली आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या २५० वर पोहोचली असून, त्यातील तब्बल १५० रुग्ण पुण्यातील आहेत. पुण्यात मागील २४ तासांत जेएन.१ च्या ५९ रुग्णांची नोंद झाली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.
जेएन.१ चे शनिवारी पुण्यात सर्वाधिक ५९ रुग्ण आढळले. पुण्यातील एकूण रुग्णसंख्या १५० असून, राज्यातील जेएन.१च्या एकूण रुग्णांपैकी ६० टक्के पुण्यात आहेत. त्याखालोखाल नागपूर ३०, मुंबई २२, सोलापूर ९, सांगली ७, ठाणे ७, जळगाव ४, अहमदनगर ३, बीड ३, छत्रपती संभाजीनगर २, कोल्हापूर २, नांदेड २, नाशिक २, धाराशिव २, अकोला १, रत्नागिरी १, सातारा १, सिंधुदुर्ग १ आणि यवतमाळ १ अशी रुग्णसंख्या आहे. राज्यात मागील २४ तासांत कोरोनाच्या ६१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्याचवेळी ७० रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत.
राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१७ टक्के असून, मृत्युदर १.८१ टक्के आहे. राज्यात मागील २४ तासांत २ हजार ७२८ चाचण्या झाल्या. राज्यातील पॉझिटिव्हिटी दर २.२३ टक्के आहे. राज्यात एकाही कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद मागील २४ तासांत झालेली नाही, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर यांनी दिली.
याबाबत बोलताना पुणे महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. भगवान पवार म्हणाले की, पुण्यातील करोना चाचण्यांची संख्या जास्त आहे. याच वेळी जनुकीय क्रमनिर्धारणासाठी सर्वाधिक नमुने पुण्यातून पाठविले जात आहेत. त्यामुळे राज्यात जेएन.१चे पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. असे असले, तरी करोनाचा जेएन.१ हा उपप्रकार फारसा धोकादायक नसून तो सौम्य स्वरूपाचा आहे.