भोर : मांढरदेव (ता. वाई, जि. सातारा) येथील श्री काळुबाई देवीच्या (मांढरदेवीचे) मुख्य रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू असल्यामुळे भाविकांच्या सुरक्षिततेचा उपाय म्हणून रविवारी (ता. ७) जानेवारी ते गुरुवार (ता. ११) जानेवारीपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे, अशा आशयाचे निवेदन मांढरदेव देवस्थान ट्रस्टच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले आहे.
मांढरदेव येथील काळेश्वरी देवीची वार्षिक यात्रा २५, २६ व २७ जानेवारी या कालावधीत होणार आहे. या काळात महिनाभर महाराष्ट्र व अन्य राज्यातील लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी गडावर येत असतात. त्यामुळे ट्रस्टच्या माध्यमातून मंदिर परिसर सुशोभीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी मंदिराच्या उत्तरेकडील दुकाने मागे सरकवून संपूर्ण परिसर मोकळा करण्यात आला आहे. मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. मंदिराकडे जाणाऱ्या चढणी पायऱ्यांचे काम पूर्ण झाले असून, उतरणी पायऱ्यांचे काम यात्रेपूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.
दरम्यान, कापूरहोळ-भोर ते मांढरदेवी या मार्गाच्या कॉंक्रिटीकरणाचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे मांढरदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना अधिक वेळ लागत आहे. परंतु पाच दिवस मंदिर बंद असल्यामुळे या मार्गावरील कामही वेगाने सुरू राहणार आहे. देवीचे मंदिर हे शुक्रवारी ११ तारखेपासून भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे.