पुणे : मी खूप मोठा गुंड आहे, आताच जेलमधून बाहेर आलो आहे. तुला पळवून नेऊन जीवे ठार मारेन, अशी दमदाटी करून १४ वर्षाच्या मुलाकडून ४५ हजार रुपये उकळणाऱ्याला स्वारगेट पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
सागर श्रवण पवार (वय. २८, रा. राजीव गांधीनगर, एस पी कॉलेज) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सॅलेसबरी पार्क येथे राहणार्या एका ३८ वर्षाच्या नागरिकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सदर प्रकार (ऑक्टोबर २०२२ ते १० फेब्रुवारी २०२३) रोजी घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या शेजारी राहणार्या सोसायटीतील एकाकडे सागर पवार हा चालक म्हणून कामाला आहे. त्याने फिर्यादी यांच्या १४ वर्षाच्या मुलासोबत ओळख करुन घेतली. त्याला त्याने मी खूप मोठा गुंड आहे.
आताच जेलमधून बाहेर आलेलो आहे. तू जर तुमच्या घरातील पैसे गुपचुप आणून नाही दिले तर तुला पळवून घेऊन जाऊन जीवे ठार मारुन टाकेल, अशी दमदाटी केली. त्याला घाबरुन फिर्यादी यांच्या मुलाने त्याला घरातील ४५ हजार रुपये आणून दिले होते.
त्यानंतर १० फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजता फिर्यादीचा मुलगा पार्किंगमध्ये खेळत होता. त्यावेळी पवार याने त्याला पुन्हा धमकी दिली त्यानंतर मुलाने हा संपूर्ण प्रकार घरच्यांना सांगितला.
हा प्रकार फिर्यादी यांना समजल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सागर पवार याला अटक केली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.