इंदापूर : देशभरात NEET 2024 या वैद्यकीय प्रवेश परीक्षेत प्रचंड मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे. या घोटाळ्यामुळे सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांची निराशा झालेली आहे. भैरवनाथ ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित, गुरुकुल विद्या मंदिर गोखळी (ता.इंदापूर) येथील 17 विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी आम्हाला न्याय मिळावा, या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका विद्यार्थ्यांनीच दाखल केली आहे.
इंदापूर तालुक्यात गुरुकुल विद्या मंदिर गोखळी हे आदर्श शैक्षणिक संकुल आहे. राज्य पातळीवर, देशपातळीवर या शैक्षणिक संकुलाचे विद्यार्थी विविध परीक्षेत सातत्याने चमकत आहेत. जीई मेन, नीट तसेच एम एच टी. सी इ टी, व डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, सैनिकी स्कूल साठी निवड परीक्षा, जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड, अशा विविध परीक्षेत दरवर्षी मोठ्या प्रमाणात राज्य पातळीवर, देशपातळीवर याच शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी यशस्वी ठरत आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्याची किमया या संस्थेच्या माध्यमातून, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब हरणावळ यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. देशभर नीट परीक्षेत झालेला घोटाळा हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावर मोठा विपरीत परिणाम करणारा ठरणार आहे. त्यामुळे या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली आहे. सेवानिवृत्त न्यायाधीशांची कमिटी तात्काळ स्थापन करण्यात यावी. या घोटाळ्याची चौकशी व्हावी व दोशींवर कठोर कारवाई व्हावी, अशीही मागणी याचिकेव्दारे विद्यार्थ्यांनी केली आहे.
याचिका दाखल केलेले विद्यार्थी
शिवम उमेश मडके, अंकिता विजयकुमार शिंदे, विशाल हनुमंत शिंदे, तेजस मसुदेव वाघमोडे, विशाल दत्तात्रय पाटील, सुकिया अनिस पठाण, संस्कृती मोहनलाल पवार, दिव्या शाहू वाघ, वैष्णवी विनायक तरंगे, आदित्य श्रीमंत राठोड, पार्थ दशरथ घोगरे, मानसी तानाजी सोलनकर, ऋतुजा सर्जेराव तरंगे, श्वेता अमोल पवार, प्रविणकुमार राजेंद्र नरुटे, श्वेता सुभाष पोंदकुले, समिक्षा बापू गलांडे यांनी याचिकेद्वारे उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
प्रसिद्ध विधीतज्ञ अँड.मिलिंद इंगोले याचिकेचे काम पाहत आहेत.