विशाल कदम
लोणी काळभोर : लोणी काळभोर व कदमवाकवस्ती हे दोन्ही पुणे शहरालगत असल्याने येथील औद्योगिकरण, शहरीकरण व नागरीकरणाचा वेग जास्त आहे. यामुळे या दोन्ही गावांमध्ये राहण्यासाठी नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या दोन्ही गावांना एका ओढ्याने विभागले आहे. मात्र, या ओढ्याची कित्येक वर्षांपासून साफसफाई न केल्याने त्याला गटारगंगेचे स्वरूप आले आहे. या परिसरात दुर्गंधी पसरल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
लोणी काळभोर व कदमवाकवस्ती परिसरात जागांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे काही नागरिकांनी ओढ्यावर अनधिकृत अतिक्रमणे थाटून कब्जा केला आहे. त्यामुळे ओढ्याचा आकार कमी झाला आहे. या ओढ्यात कचरा, टाकाऊ साहित्य आणि गाळ मोठ्या प्रमाणात साचलेला आहे. या ओढ्यात जलपर्णी व काटेरी झाडेसुद्धा प्रचंड वाढलेली आहेत. त्यामुळे या ओढ्याचा वेग मंदावलेला आहे. परिणामी, दुर्गंधीसह आरोग्याच्या समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. भविष्यात या ओढ्यामुळे आरोग्याची मोठी समस्याही निर्माण होऊ शकते.
प्रशासनाने पावसाळ्यापूर्वीच नियोजन करणे गरजेचे आहे. पावसाळ्यात रामदाराच्या डोंगरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. तसेच खडकवासला धरणातून मुळा मुठा कालव्यात पाणी सोडले जाते. त्यामुळे पावसाचे व कालव्याचे पाणी ओढा व नाल्यामार्फत नदीला वाहत जाते. मात्र, या ठिकाणी नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यातच अनेक सोसायट्यांनी ड्रेनेजचे पाणी थेट ओढ्यात सोडले आहे. त्यामुळे लोणी काळभोरमध्ये पावसाळ्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते.
संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा दरवर्षी लोणी काळभोर येथे मुक्कामी येतो. या सोहळ्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी सहभागी होतात. या वारकऱ्यांना राहण्यासाठी कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत पालखी स्थळ बांधण्यात आले आहे. हे पालखी स्थळ ओढ्यालगत आहे. ओढ्याची स्वच्छता नसल्याने पालखी स्थळाच्या परिसरात दुर्घंधी पसरलेली आहे. यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होणार आहे.
ओढा ठरतोय नागरिकांसाठी डोकेदुखी
दोन्ही गावांच्या मध्यातून जाणाऱ्या ओढ्याची अनेक वर्षांपासून साफसफाई न केल्याने हा ओढा सर्वसामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या ओढ्याची स्वच्छता करण्यासाठी दोन्ही ग्रामपंचायतींनी, सामाजिक संस्था व पाटबंधारे खात्याने कोणतीही उपाययोजना न केल्याचे चित्र समोर येत आहे. या दुर्गंधीमुळे एखादा साथीच्या आजाराने शिरकाव केला आणि एखादी मोठी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण? असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
10 वर्षांपासून मल निस्सारण केंद्र प्रतिक्षेतच
कदमवाकवस्ती व लोणी काळभोर या दोन्ही गावांची लोकसंख्या सुमारे दोन लाखांच्या आसपास आहे. लोणी काळभोर येथील नागरिकांना प्राथमिक सुविधा मिळाव्यात, यासाठी मल निस्सारण केंद्र उभारण्यात आलेले आहे. मात्र, गेली १० वर्षांपासून रखडलेले आहे. लोणी काळभोर येथील मल निस्सारण केंद्राला गेल्या १० वर्षांपूर्वी सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. या कालावधीत ५ ते १० सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य झाले. मात्र, याकडे कोणीही लक्ष न दिल्याने सदर काम रखडलेले आहे. मग या कामासाठी शासनाकडून निधी मिळालेला गेला कुठे? हे काम बंद किंवा का रखडलेले आहे. याबाबत अद्यापही कोणालाच काही माहिती नाही.
त्वरित उपाययोजना कराव्यात
लोणी काळभोर व कदमवाकवस्ती येथील ओढा हा नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे. त्यामुळे या दोन्ही ग्रामपंचायती, सामाजिक संस्था व पाटबंधारे खात्याने तत्काळ या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. नागरिकांच्या हितासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात.
– आकाश कुलकर्णी, लोणी काळभोर, ता. हवेली.
मल निस्सारण केंद्राचे काम जुने असल्याने माहिती नाही
लोणी काळभोर हद्दीतून गेलेल्या ओढ्याची स्वच्छता करण्यासाठी लवकरच ग्रामसभा घेऊन उपाययोजना करण्यात येतील. मल निस्सारण केंद्राबाबत सांगायचे झाले तर हे काम खूप जुने असल्याने याची माहिती सांगता येणार नाही. याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळेल.
– सतीश गवारी, ग्रामसेवक, लोणी काळभोर.
निधी मिळाल्यानंतर ओढ्याची स्वच्छता करू
ओढ्याच्या स्वच्छतेसाठी व देखभालीसाठी निधी मिळावा, यासाठी शासनाला प्रस्ताव पाठवलेला आहे. सध्या आचारसंहिता चालू असल्याने हा प्रस्ताव मंजूर होण्यास उशीर होत आहे. मात्र, हा प्रस्ताव मंजूर होऊन निधी मिळाल्यानंतर लवकरच ओढ्याची स्वच्छता करण्यात येईल.
– अमोल घोळवे, ग्रामविकास अधिकारी, कदमवाकवस्ती.
या कामाचा पाटबंधारे खात्याशी संबंध नाही
ओढ्याची स्वच्छता व साफसफाई करण्याचे काम ग्रामपंचायतीच्या अधिपत्याखाली येते. या कामाच्या बाबतीत पाटबंधारे खात्याचा कोणत्याही प्रकारचा संबंध येत नाही.
– पल्लवी जोशी, अधिकारी, पाटबंधारे विभाग, लोणी काळभोर.