-संतोष पवार
पळसदेव : समग्र शिक्षा अंतर्गत शालेय शिक्षण व साक्षरता विभाग नवी दिल्ली व महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे यांच्या वतीने आयोजित कला उत्सव स्पर्धेस पुण्यात दि.13 नोव्हेंबर पासून उत्साहात प्रारंभ झाला.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांचे मार्गदर्शन व प्रेरणेने महात्मा फुले सभागृहात कला उत्सव स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी परिषदेचे सहसंचालक अनुराधा ओक, सामाजिक शास्त्र व कला क्रीडा विभागाच्या उपसंचालक डॉ. माधुरी सावरकर, उपसंचालक ज्योती शिंदे यांच्यासह परिषदेतील अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
श्रीमती ओक म्हणाल्या, की सर्व विद्यार्थी जिल्हास्तरावरील स्पर्धांमध्ये यश मिळवून राज्यस्तरावर सहभागी होत आहेत. ही आनंदाची व कौतुकाची गोष्ट आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर उत्तम सादरीकरण करावे. कारण राज्यस्तरावर यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा नावलौकिक उंचावण्याची संधी आहे. तसेच प्रत्येक स्पर्धेमध्ये यश, अपयश या बाबी असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता राज्यस्तरावर मिळणाऱ्या अनुभवाच्या आधारे नव्या उमेदीने नव्या जोमाने नवनवीन स्पर्धांची तयारी करावी. अन्य स्पर्धकांनी केलेले सादरीकरण सुद्धा आवर्जून पहावे. अन्य स्पर्धकांनी केलेल्या चांगल्या सादरीकरणाला दाद द्यावी.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन चव्हाण यांनी केले. स्पर्धेचे स्वरूप नियम व अटी यांची माहिती उपसंचालक डॉ. सावरकर यांनी दिली. अधिव्याख्याता संघप्रिया वाघमारे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विषय सहाय्यक बाळासाहेब गायकवाड यांनी केले. संगीत शिक्षिका पद्मजा लांमरुड यांनी संपूर्ण कला उत्सव स्पर्धेचे संयोजन केले. विषय सहाय्यक अण्णासाहेब कुटे, विनया भोसले यांनी संयोजनासाठी सहाय्य केले.
परिषदेचे संचालक राहूल रेखावार यांचे नेतृत्व व मार्गदर्शनात राज्यस्तरीय कला उत्सव स्पर्धा (दि. 13 ते 15 नोव्हेंबर) या कालावधीत पुण्यातील महात्मा फुले सभागृहात संपन्न होत आहे. तत्पूर्वी राज्याच्या 35 जिल्ह्यातून 5969 विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर सहभाग घेतला होता. त्यातून सर्वोत्कृष्ट ठरलेल्या 418 विद्यार्थ्यांचे या कालावधीत सादरीकरण होणार आहे . जिल्हास्तरावर कला उत्सव स्पर्धेचे आयोजन व अंमलबजावणी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता यांनी केली.
स्पर्धेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे –
दि.13.11.24 – सकाळ सत्र.- कथाकथन (एकल अथवा समूह )
दुपार सत्र – संगीत गायन (एकल अथवा समूह )
दि.14.11.24 – सकाळ सत्र –
शास्त्रीय नृत्य ,लोक नृत्य (एकल अथवा समूह )
दुपार सत्र – चित्र,शिल्प, खेळणी तयार करणे.
दि.15.11.24 सकाळ सत्र – संगीत व वादन (एकल अथवा समूह )
दुपार सत्र – नाट्य (एकल अथवा समूह )