विशाल कदम
लोणी काळभोर : मकर संक्रांतीला पतंग उडवण्याचा आनंद सर्वजण लुटतात. मात्र, गोर-गरीब, अनाथ मुलांना या आनंदापासून वंचित राहावे लागते. अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, विविध खेळांचा आस्वाद घेण्याची संधी मुलांना मिळावी, यासाठी हडपसर येथील धर्मवीर शंभूराजे अनाथालयातील विद्यार्थ्यांना क्रिकेट सेट, कॅरम, बॅडमिंटन, टेनिस रॅकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, थ्रो बॉल, पतंगी आणि मांजा, बुद्धिबळ, लुडो अशा धमाल क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. मकर संक्रांतीचे औचित्य साधून, एसएई कॉलेजिएट क्लब आणि विद्यार्थी कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले होते.
या प्रसंगी एमआयटी स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड सायन्सचे डीन प्रा. डॉ. सुदर्शन सानप यांनी उपस्थिती लावली. धर्मवीर शंभूराजे अनाथालयाचे अध्यक्ष मारुती आबा तुपे आणि व्यवस्थापक कुणाल चावरे हे या उत्सवात सहभागी झाले होते. प्रा. डॉ.सानप यांनी आयोजकांचे कौतुक केले व मारुतीआबा तुपे व कुणाल चवरे यांच्या परिश्रमांचे कौतुक केले. विद्यार्थी व्यवहार विभागाचे सहयोगी संचालक प्रा. डॉ. सूराज भोयर यांनी एसएई क्लबच्या सदस्यांचे त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल कौतुक केले. प्रा. डॉ. अनुराग नेमा, प्रा. अजयकुमार उगले आणि प्रा. शशांक गावडे यांच्यासह प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांमध्ये बदल घडवून आणला. विद्यार्थी समन्वयक ऐश्वर्या भिंगे, रणजीत शेळके आणि माविया तांबे यांनी उत्साहाने या उपक्रमाचे नेतृत्व केले.
या दिवशी मुले आनंदाने भारावून गेली होती. लहान मुले आणि वृद्ध रहिवाशांना क्रीडा साहित्य आणि आवश्यक वस्तू दान करण्यात आल्या. पतंग उडवण्याचा कार्यक्रम आणि संवादात्मक सत्रामुळे मुलांना आनंद झाला. फराळाचे पदार्थ वाटून घेण्यात आले, ज्यामुळे सर्वांनी एकत्रित फराळाचा आनंद लुटला. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. विद्यार्थ्यांनी समाजात बदल घडवून आणण्याची शपथ घेतली. एसएई कॉलेजिएट क्लब, एमआयटी एडीटी विद्यापीठाने हे सिद्ध केले की दयाळूपणाची छोटी कृती देखील मोठा फरक दाखवू शकते.