पुणे: ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक लढाया जिंकल्या. कधी कुठल्या महिलेवर अत्याचार केला नाही. राज्य पादाक्रांत केली पण अन्य धर्मीयांची प्रार्थनास्थळं उद्धवस्त केल्याची एकही घटना नाही. मी नेहमी सांगतो, ” शिवाजी महाराज सेक्युलर राजे होते”. शिवाजी महाराज यांच्या येवढा सेक्युलर राजा झालाच नाही. सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष नाही तर सर्वधर्मसमभाव होय. सर्व धर्मांबद्दल सन्मान ठेवणारा, हिंदुस्थानच्या इतिहासातला खरा सेक्युलर राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज’ असं वक्तव्य केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात केलं. नितीन गडकरींच्या वक्तव्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या अमृतमहोत्सव अभिष्टचिंतन सोहळा पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात पार पडला. यावेळी नितीन गडकरींनी हे वक्तव्य केलं. त्यावेळी गडकरींनी केलेल्या दोन वक्तव्याची सध्या चर्चा होताना दिसत आहे. नितीन गडकरी यांनी यावेळी शिवाजी महाराजांच्या सेक्यूलर भूमिकेवर वक्तव्य केल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांच्या भूवया उंचावल्या आहेत. तसेच राजकारणात युज अँड थ्रो केला जातो, असंही नितीन गडकरींनी यावेळी म्हटलं. गडकरींनी पक्षापेक्षा वेगळी भूमिका मांडल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श पिता, आदर्श राजा..
” माझ्या आई-वडिलांपेक्षा मी छत्रपती शिवाजी महाराज यांना अधिक मानतो. कोणत्याही कसोटीवर पाहा, छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श पिता, आदर्श राजा ठरतात. आदर्शाच्या कल्पनेवर उतरणारा या देशातला एकमेव राजा म्हणजे शिवाजी महाराज होते. न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी कधी अन्याय केला नाही. आपला मुलगा जरी असेल तरीही पाठराखण केली नाही. त्यांनी प्रत्येक निर्णय जनतेच्या हिताचा घेतला,अनेक लढ्या जिंकल्या. पण कुठल्या ठिकाणी, कुठल्याही परिस्थितीत एकाही स्त्रीवर अत्याचार केल्याची घटना शिवारायांच्या काळात घडली नाही.
अनेक लढाया महाराजांनी जिंकल्या, राज्य पादाक्रांत केली. पण अन्य धर्मीयांची प्रार्थनास्थळं उद्धवस्त केल्याची एकही घटना पहावयास मिळत नाही.मी नेहमी सांगतो, शिवाजी महाराज सेक्यूलर होते, असतील. शिवाजी महाराज इतका सेक्युलर राजा झालाच नाही. सेक्युलर शब्दाचा अर्थ इंग्रजी डिक्शनरीमध्ये पाहिला तर सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष नाहीये तर सर्वधर्मसंभव आहे. सर्व धर्मांबद्दल सन्मान ठेवणारा, हिंदुस्थानच्या इतिहासातला खरा सेक्युलर राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे’ असं यावेळी नितीन गडकरी म्हणाले.
शिवाजी महाराज यांचं संगोपन जिजाऊ यांनी केलं..
शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचे दैवत आहे. माझ्या दिल्लीमधल्या कार्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो लावलेला आहे. जेव्हा जेव्हा संकट येईल तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजाच्या इतिहासातून उत्तर येईल. राजमाता जिजाऊंचं स्मारक खेडकर यांनी उभं केलं. जिजाऊ नसत्या तर शिवाजी महाराज झाले नसते. ज्यांचे आई-वडिल चांगले संस्कार देतात, त्यांची मुलं चांगली सुसंस्कृत आचरण करतात. कितीही धनवान असू द्या, जे आई-वडिल आपल्या मुलांवर चांगले संस्कार करत नाही, त्यांचं आयुष्यात पुढे काय होतं ते पाहा. शिवाजी महाराज यांचं संगोपन जिजाऊ यांनी केलं, त्यामुळे विशाल रुप सगळ्यांना बघायला मिळालं, असंही नितीन गडकरी म्हणाले.
‘अनेक समाजांनी मिळून आपला देश तयार झाला आहे. परंतु राजकारणाबद्दल माझं मत काही चांगलं नाही. राजकारणात फक्त युज आणि थ्रो केला जातो’, असं नितीन गडकरी म्हणाले. नितीन गडकरींचा इशारा कोणावर होता? अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पक्ष आणि संघटनेत माणूस म्हणून विचार करणे आवश्यक असतं, असंही गडकरी यावेळी म्हणाले होते.